गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑक्टोबर 2016 (20:31 IST)

व्हर्टीकल स्टुडीओचे आयोजन, किफायतशीर घरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात प्रत्येकाला राहण्यासाठी चांगले घर मिळायला हवे यासाठी ‘प्रधानमंत्री आवास’ योजना सुरु केली आहे. याच संकल्पनेवर आधारित घरे बनविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आयडीया कॉलेज काम सुरु करत आहे. यात अनेकदा शहरांमध्ये कमी जागेत सर्व सुविधांनी परिपूर्ण आणि किफायतशीर घरे कशी बनवता येतात याचे प्रत्यक्ष सादरीकरण महाविद्यालयातील विद्यार्थी करणार आहे.
 
विद्यावर्धन ट्रस्ट यांच्या मार्फत इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इंव्हारमेन्ट अॅण्ड आर्किटेक्चर अर्थात आयडिया कॉलेज कार्यरत आहे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा यासाठी महाविद्यालयाकडून नेहमीच उपक्रम राबविले जातात. याअंतर्गत ‘व्हर्टीकल स्टुडीओ’ चे आयोजन केले जाते. यात विद्यार्थी थेट ऑफिस थाटून व्यवसायिक पद्धतीने काम करतात.
 
यंदा व्हर्टीकल स्टुडीओसाठी ‘शहरी भागात किफायतशीर घरे’ असा विषय निवडण्यात आला आहे. गेल्या काही वर्षात शहरांमध्ये येऊन काम करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड गतीने वाढत आहे. त्यामुळे शहरांमध्ये घरे मिळविणे कठीण बनले आहे. याकडे पाहात अतिशय कमी जागेत मात्र सर्व सुविधांनी परिपूर्ण आणि किफायतशीर घरे बनविण्याकडे आता विशेष लक्ष दिले जात आहे. त्यामुळे आजच्या काळाची ही गरज ओळखून महाविद्यालयाने याबाबत मुलांना प्रत्यक्ष कार्यानुभव देण्याचे ठरविले आहे.  
 
यंदा दिनांक २१ ते २४ या कालावधीमध्ये व्हर्टीकल स्टुडीओचे आयोजन करण्यात आले आहे. यात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे सोडत पद्धतीने ग्रुप बनवून संपूर्ण माहिती दिली जाईल. पुढे दोन दिवस विद्यार्थी त्यावर प्रत्यक्ष काम करतील. आणि शेवट्या दिवशी त्यांनी केलेल्या कामाचे सादरीकरण करण्यात येईल. या संपूर्ण कामांमध्ये विद्यार्थ्यासोबत बाहेरून आलेले व्यवसायिक आर्किटेक्ट सुद्धा त्याच्यासोबत दिवसरात्र काम करणार आहे. यंदा प्रतिक धानमेर (डहाणू), विनित निकुंभ (मुंबई), यतिन पंड्या (अहमदाबाद), मनोज कुमार (तिवेद्रम) आणि जय(मुंबई) आणि नम्रता कपूर (मुंबई) येत आहेत. ही सहा तज्ञ मंडळी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करणार आहेत. प्रत्येकी ५० विद्यार्थांचा ग्रुप असे त्याचे स्वरूप असून प्रत्यक्ष केलेल्या कामाचे शेवटच्या दिवशी सादरीकरण करण्यात येणार आहे.        
 
या ‘व्हर्टीकल स्टुडीओ’ च्या माध्यमातून लोकांचे शहरात असलेले घरांचे स्वप्न कसे पूर्ण करता येईल याचा शोध घेतला जाणार असल्याचे आयडीयाकडून सांगण्यात आले आहे. तरी या ‘व्हर्टीकल स्टुडीओ’ पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी नाशिककरांनी अवश्य यावे असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे.  
 
‘धारावी ऑन सेल’ या माहितीपटाचे सादरीकरण 
या ‘व्हर्टीकल स्टुडीओ’ च्या दुसऱ्या दिवशी अर्थात दिनांक २२ ऑक्टो, शनिवार संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत ‘धारावी स्लम ऑन सेल’ या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. हा माहितीपट लुट्ज कोरेनमन आणि रॉब अप्पलबाय यांनी बनवला आहे. हा माहितीपट बघण्यासाठी आवर्जून यावे असे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले आहे.