मंगळवार, 21 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (13:31 IST)

ऐश्वर्या रायबद्दल राहुल गांधी असं काय म्हणाले, ज्यामुळे त्यांच्यावर टीका होतेय?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी सध्या भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त देशभरात फिरत आहेत. या यात्रेदरम्यान राहुल गांधी आरक्षण, बेरोजगारी आणि उद्योगपतींशी संबंधित मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
 
राहुल गांधी त्यांच्या वक्तव्यांमध्ये ओबीसी समूहाचा आणि गरिबांचाही उल्लेख करत आहेत.
 
यादरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून वाद सुरू झाला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी झालेल्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या संदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
 
राहुल गांधींनी त्यांच्या यात्रेदरम्यान भाषणांमध्ये बोलताना म्हणाले, "श्रीराम मंदिराच्या सोहळ्यात एखादी गरीब, मागास, दलित किंवा आदिवासी व्यक्ती दिसली नाही. पण अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांच्याबरोबरच गौतम अदानींसह उद्योजक मात्र नक्कीच दिसले."
 
खरं म्हणजे श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात ऐश्वर्या राय आणि गौतम अदानी हे उपस्थितच नव्हते. त्यामुळे राहुल गांधींच्या वक्तव्यावर आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा यांनी आक्षेप घेतला आहे.
 
ऐश्वर्या रायबाबत काय म्हणाले राहुल गांधी?
12 फेब्रुवारीला राहुल गांधींनी छत्तीसगडच्या कोरबामध्ये याबाबत वक्तव्य केलं होतं.
 
"तुम्ही राम मंदिराचं उद्घाटन पाहिलं. त्यात तुम्ही गरीब व्यक्ती पाहिली? मला त्यात अमिताभ बच्चन दिसले, ऐश्वर्या राय दिसल्या, अदानी दिसले, अंबानी दिसले. सगळेच उद्योगपती दिसले. मला एकही गरीब व्यक्ती दिसली नाही. मला तिथं एकही शेतकरी, मजूर, बेरोजगार, चहावाला, लहान दुकानदार दिसला नाही. सगळेच अब्जाधीश दिसले," असं राहुल गांधी म्हणाले होते.
 
त्यानंतरही राहुल गांधींनी अनेकदा त्यांच्या यात्रेत काही वक्तव्यं केली.
 
"मीडिया आमचं बोलणं दाखवत नाही. मीडिया तुम्हाला 24 तास नरेंद्र मोदींना दाखवेल. ऐश्वर्या रायला दाखवेल. मोदीजींच्या बाजूला अमिताभ बच्चन फिरताना दिसतील," असं ते म्हणाले होते.
"भारतीय मीडियाला गरिबांना दाखवायचं नाही. ऐश्वर्या रायला नाचताना दाखवायचं आहे," असंही राहुल गांधी यात्रेदरम्यान एका ठिकाणी म्हणाले आहेत.
 
आणखी एका प्रसंगात यात्रेदरम्यान एकदा राहुल गांधींनी एका तरुणाला बोलावून माईक दिला आणि म्हणाले, "खिसा कसा कापला जातो हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? तिकडे पाहा पाकिस्तान, इकडे पाहा चीन, ती पाहा ऐश्वर्या राय. असं इकडं-तिकडं दाखवून तुमचा खिसा कापला जात आहे."
 
पण आता राहुल गांधींच्या अशा वक्तव्यांमुळं सोशल मीडियावर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
 
स्मृती इराणी आणि सोना मोहपात्रा काय म्हणाल्या?
स्मृती इराणी अमेठीच्या खासदार आहेत. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राहुल गांधींचा पराभव केला होता.
 
राहुल गांधींनी ऐश्वर्या राय यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांविषयी स्मृती इराणी यांनी एका खासगी वाहिनीवर प्रतिक्रिया दिली.
 
"हे फारच घाणेरडे (घटिया) आहे. मी आजवर राहुल गांधींसाठी असे शब्द वापरले नाहीत. जे वडिलांच्या मित्राच्या सुनेलाही सोडत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? माफी तर ते मागणार नाहीत. सोनियांना आता वाईट वाटणार नाही. श्रीमती वाड्राही आता मौन धरून बसतील. पण वडिलांच्या मित्राच्या सुनेबाबत कोण असं बोलतं?" असं स्मृती इराणी म्हणाल्या.
 
"जे कुटुंबाशी जवळचे संबंध असलेल्यांचा आदर करत नाही, ते देशातील दुसऱ्या महिलांचा काय आदर करणार? सोनिया गांधी ऐकत असतील तर मी त्यांना सांगू इच्छिते की, हे घाणेरडे (घटिया) आहे," असंही स्मृती इराणी म्हणाल्या.
 
राहुल यांच्या वक्तव्यावर सोना मोहपात्रा यांनीही टीका केली आहे.
 
"काही नेते फायदा मिळवण्यासाठी त्यांच्या भाषणांमधून महिलांचा अपमान करत आहेत. प्रिय राहुल गांधींनी याआधी त्यांच्या आई आणि बहिणीचाही नक्कीच असा अपमान केला असेल. आणि हो, ऐश्वर्या राय खूप सुंदर नाचते," अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली.
 
कर्नाटक भाजपच्या सोशल मीडिया हँडलवरूनही राहुल गांधींनी ऐश्वर्या राय यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे.
 
ऐश्वर्या रायनं 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांतही तिनं अभिनय केला आहे. त्यामुळं देशाची मान उंचावणाऱ्या ऐश्वर्या रायचा राहुल गांधी अपमान कसा करू शकतात? अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
 
गांधी आणि बच्चन कुटुंबातील संबंध
स्मृती इराणी यांनी गांधी कुटुंब आणि अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबात जवळचे संबंध असल्याचा उल्लेखही केला.
 
गांधी आणि बच्चन कुटुंबातील संबंध अत्यंत जुने आहेत. पण गेल्या काही वर्षांमध्ये या नात्यांमध्ये दुरावा आल्याचं पाहायला मिळालं होतं.
 
इंदिरा गांधी आणि तेजी बच्चन यांच्यात इंदिरा गांधींचं लग्नं होण्याच्या आधीपासूनची मैत्री होती. त्यामुळं दोन्ही कुटुंबांमध्ये अत्यंत घनिष्ठ संबंध होते. ते वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकायचे पण सुट्यांमध्ये एकत्र जमायचे.
 
राजीव गांधींनी लग्न करण्याच्या आधी सोनिया इटलीहून आल्यानंतर काही दिवस बच्चन कुटुंबीयांबरोबर राहिल्या होत्या. भारतीय कुटुंबाबरोबर सोनिया गांधी तेव्हा पहिल्यांदाच राहिल्या होत्या.
 
सोनिया गांधींच्या विवाहाचे अनेक विधीही बच्चन कुटुंबीयांबरोबरच पूर्ण झाले होते. तेजी बच्चन यांच्या सांगण्यावरूनच इंदिरा गांधींनी सोनियांना भारतीय परंपरा, चालीरितींबाबत माहिती दिली होती.
 
त्यानंतर जेव्हा राजीव गांधींचं लग्न झालं तेव्हा इंदिरा गांधी 'एक, सफदरजंग रोड' या ठिकाणी राहायला आल्या होत्या. तर बच्चन कुटुंबाचं घर जवळच 13,विलिंग्डन क्रिसेंटमध्ये होतं. तेव्हा लग्नाचे काही विधी बच्चन कुटुंबीयांच्या घरातूनच झाले होते.
 
या दोन कुटुंबांमध्ये असलेल्या जवळच्या नात्याचं आणखी एक उदाहरण आहे. अमिताभ बच्चन जेव्हा 'कुली' चित्रपटाच्या शूटिंगवेळी जखमी झाले, तेव्हा ब्रीच कँडी रुग्णालयात होते. त्यावेळी राजीव गांधी अमेरिकेतून त्यांना भेटण्यासाठी आले होते, तर इंदिरा गांधी दिल्लीहून तिथं पोहोचल्या होत्या.
 
इंदिरा गांधींच्या अंत्य संस्काराच्या वेळी अमिताभ बच्चन राजीव गांधींच्या अगदी जवळ उभे होते.
 
अमिताभ बच्चन यांनी इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधींच्या म्हणण्यावरून अलाहाबादमधून निवडणूक लढवली आणि हेमवती नंदन बहुगुणा यांचा पराभव केला होता.
 
नात्यातील दुरावा
राजीव गांधींच्या कार्यकाळातच बोफोर्स तोफांच्या प्रकरणातील आरोपांनंतर अमिताभ बच्चन यांचं राजकारणातून मन उठलं होतं. पण तरीही त्यांची मैत्री कायम होती.
 
अगदी राजीव गांधींच्या मृत्यूनंतरही अमिताभ बच्चन आणि गांधी-नेहरू कुटुंबातील जवळचं नातं कायम होतं.
 
नंतर बोफोर्स प्रकरणात राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन यांना क्लीन चीट मिळाली.
 
स्वीडनचे माजी पोलिस प्रमुख स्टेन लिंडस्ट्रोम हे दीर्घकाळ ओळख लपवून होते. बोफोर्स घोटाळ्यात भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या विरोधात लाच घेतल्याचे पुरावे नव्हते, असं त्यांनी 2012 मध्ये म्हटलं होतं.
 
याच दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी एबीसीएल कंपनी सुरू केली आणि त्यामुळं प्रचंड कर्जात बुडाले. अमिताभ यांच्यासाठी तो अत्यंत संकटाचा काळ होता. या काळात अमर सिंह यांच्याशी बच्चन कुटुंबाची जवळीक वाढली. पण नंतर बच्चन कुटुंब आणि अमर सिंह यांच्यातही दुरावा आला होता.
 
मात्र गांधी कुटुंबाशी बच्चन कुटुंबाचा दुरावा नंतर स्पष्टपणे पाहायला मिळत होता.
 
पण 2015 मध्ये बच्चन कुटुंबाच्या एका विवाह सोहळ्यात प्रियांका गांधी कुटुंबाच्या वतीनं सहभागी झाल्या होत्या.
 
अभिनेता कुणाल कपूर आणि अजिताभ बच्चन यांची मुलगी नैना यांचा विवाह झाला होता. या विवाह सोहळ्यात प्रियांका गांधी आणि रॉबर्ट वाड्रा सहभागी झाले होते.
 
2012 मध्ये अमिताभ बच्चन एका मुलाखतीत याबाबत बोलले होते.
 
"माझ्या मनात काहीही नाही. मी कायम त्यांचा आदर करतो. आम्ही कधी-कधी सार्वजनिक सोहळ्यांमध्ये भेटतो. राग किंवा तणावासारखं काहीही नाही. आमचं नातं अजूनही अगदी तसंच आहे. नात्यात कटुता आलेली नाही," असं अमिताभ बच्चन म्हणाले होते.
 
Published By- Priya Dixit