नवी दिल्लीत झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत अधिकृतपणे कोणत्याही नेत्याला पंतप्रधान पदाचा चेहरा घोषित करण्यात आलेलं नाही.
पण आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी मीडियाला सांगितलं - ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या नावाचं समर्थन केलं.
'इंडिया' आघाडीतील दोन मोठ्या नेत्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पुढे केल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे हे नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदासाठी आव्हान देऊ शकतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव 'इंडिया' आघाडी आणि काँग्रेस स्वीकारणार का, असाही प्रश्न आहे.
82 वर्षीय मल्लिकार्जुन खरगे हे दलित नेते असून गेल्या 55 वर्षांपासून भारतीय राजकारणात सक्रिय आहेत.
खरगे यांच्याबद्दल काही गोष्टी
सामान्य कुटुंबातून आलेले खरगे हे मूळचे कर्नाटकातील आहेत.
1969 मध्ये गुलबर्गा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले
कर्नाटकात दीर्घकाळ आमदार होते आणि दोनवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
गेल्या सात-आठ वर्षांपासून दिल्लीच्या राजकारणात सक्रिय आहेत
त्यांच्या दीर्घ राजकीय प्रवासात फक्त एकदाच 2019च्या लोकसभा निवडणुकीत ते हरले.
खरगे हे 2021 पासून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आहेत.
इंडिया आघाडीचं दलित कार्ड?
भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एकही दलित नेता पंतप्रधानपदापर्यंत पोहोचलेला नाही. अशास्थितीत खरगे यांचं नाव पुढे करून विरोधकांनी दलित कार्ड खेळल्याचं विश्लेषकांचं मत आहे.
भारतात लोकसंख्येचा कोणताही जातीचा डेटा नाही, तरी अंदाजानुसार भारतात सुमारे 25 टक्के दलित आहेत.
खरगे यांचं नाव पुढे करण्याच्या कारणाबाबत ज्येष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी म्हणतात,
"मल्लिकार्जुन खरगे हे दलित नेते आहेत. सध्याच्या राजकारणात मोदी हा एनडीएचा ओबीसी चेहरा आहे. नितीश कुमार हा इंडिया आघाडीचा ओबीसी चेहरा असू शकतो, पण ओबीसी चेहरा म्हणून मोदींशी स्पर्धा करणं नितीशकुमार यांना सोपं नाही हे इंडिया आघाडीला समजलं आहे. त्यामुळे आता एक नवीन दलित कार्ड खेळलं गेलं आहे.
कारण आतापर्यंत भारतात एकही दलित पंतप्रधान झालेला नाही. खरगे यांना आपला चेहरा घोषित करून इंडिया आघाडी निवडणूक रंगतदार बनवू शकते."
मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पुढे करून इंडिया आघाडीने आगामी लोकसभा निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक आणि रंगतदार बनवली आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार हेमंत अत्री यांनी व्यक्त केलं.
हेमंत अत्री म्हणतात, "मल्लिकार्जुन खरगे हे देशातील मोठे दलित नेते आहेत. भारतीय राजकारण बघता अजून एकही दलित पंतप्रधान झालेला नाही. देशात दलितांची संख्या मोठी आहे. ही समीकरणं लक्षात ठेवली तर मल्लिकार्जुन खरगे आगामी निवडणूक रंगतदार बनवू शकतात."
आकडेवारी काय सांगते?
भारतात लोकसभेच्या दलित(एससी) आरक्षित 84 जागा आहेत.
भाजपकडे यातील 46 जागा आहेत.
या जागांवर भाजपला 40 टक्के मतं मिळाली आहेत.
84 पैकी काँग्रेसकडे फक्त 5 जागा आहेत.
उत्तरप्रदेशात दलितांसाठी 17 जागा राखीव आहेत.
यामध्ये भाजपला 15, बसपाला दोन, काँग्रेसला एकही जागा नाही.
अशा स्थितीत इंडिया आघाडीनं मल्लिकार्जुन खरगे यांना विरोधकांचा चेहरा बनवलं तरी दलित मतं इंडिया आघाडीसोबत जातील का, असा प्रश्न उपस्थित होतो.
विजय त्रिवेदी म्हणतात, " रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती करून भाजपने आधीच दलित कार्ड खेळलं आहे आणि त्याचा मोठा फायदा घेतला आहे. ओबीसींपाठोपाठ दलित मतदारही मोठ्या प्रमाणात भाजपशी जोडले जात आहेत. आज काँग्रेस तळागाळात खूपच कमकुवत आहे.
विधानसभा निवडणुकीत दलितांची मते काँग्रेसला नक्कीच मिळाली आहेत, पण भाजपच्या तुलनेत काँग्रेस या समीकरणात अजूनही खूपच कमकुवत आहे. खरगे यांना केवळ चेहरा करून मोदींचा सामना करता येणार नाही. हा काही हुकमी एक्का नसेल, ते फक्त लढत रंगतदार बनवतील."
इंडिया आघाडीचं अंतर्गत राजकारण
इंडिया आघाडीत अनेक मोठे नेते आहेत जे स्वतः पक्ष नेतृत्व करत आहेत आणि स्वतःला आघाडीचे नेते म्हणून पाहत आहेत.
अशा नेत्यांमध्ये सर्वांना मान्य असलेल्या नेत्याचं नाव पुढे करणं हे आघाडीसाठी आव्हान ठरू शकतं.
पण, विश्लेषकांचं असं मत आहे की आघाडीमधील अनेक नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याप्रमाणे गांधी परिवार किंवा राहुल गांधी यांच्या नावाशी सहमत नसतील.
विजय त्रिवेदी म्हणतात की, " ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल हे गांधी परिवारापासून अंतर राखू पाहताहेत, त्यांना राहुल गांधींना यांना नेता म्हणून पुढे करायचं नाही, म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव हा एक पर्याय होता . म्हणजेच या लढाईत राहुल गांधी नसतील. असं करुन इंडिया आघाडीतील अंतर्गत राजकारण साधल आहे."
काँग्रेसचा एक मोठा वर्ग हा आगामी निवडणुकीत राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करत होते. असं असलं तरी राहुल गांधी यांनी स्वतः असं कधीच केलं नाही.
पण राहुल गांधींच्या नावांवर सर्व पक्षांचं एकमत करणं काँग्रेससाठी सोपं नाही.
मात्र, हेमंत अत्री यांनी राहुल गांधींच्या जागी खरगे यांना पुढे करण्याचं दुसरं कारण सांगितलं.
"एका रणनीतीनुसार खरगे यांना पुढे आणलं आहे. एक कारण म्हणजे राहुल गांधी कधीच अल्पमतातील सरकारचं नेतृत्व करणार नाहीत. राहुल हे जाहीरपणे बोलले नसले तरी ते स्पष्ट आहे.
जेव्हा-जेव्हा राहुल गांधी रॅलीत सहभागी होतात, तेव्हा विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये गांधी घराण्याचं नेतृत्व स्वीकारण्यात एक प्रकारचा संकोच असतो. काँग्रेस हा सर्वांत मोठा विरोधी पक्ष आहे, यात शंका नाही पण संपूर्ण विरोधकांना राहुल मान्य नाहीत."
पण या नावावर इंडिया आघाडीचं एकमत होईल की नाही, काँग्रेसला मान्य होईल की नाही, असाही प्रश्न आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत खरगे बोलत होते, तेव्हा लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार निघून गेले होते.
हेमंत अत्री सांगतात, " काँग्रेसमध्येही खरगे यांच्या नावाला आक्षेप असणार नाही. आघाडीमध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांना काही आक्षेप असू शकतात, कारण नितीश कुमार यांना चेहरा घोषित केल्यास बिहारमध्ये लालू कुटुंबाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र, ही अट काढून टाकल्यास खरगे यांच्या नावावर कोणाचाही आक्षेप राहणार नाही."
ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकतील का?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवळपास दहा वर्षांपासून भारतीय राजकारणातील सर्वांत मोठा चेहरा आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका या भाजपनं मोदींच्या चेहऱ्यावर लढवल्या.
भाजपने मध्य प्रदेशात आपलं सरकार वाचवलं आणि छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढलं. या तिन्ही राज्यात मोदींच्या नावावर निवडणुका लढल्या गेल्या. मध्य प्रदेशात तर 'एमपीच्या मनात मोदी, मोदींच्या मनात एमपी' असा नारा देण्यात आला.
एवढंच नाही तर कोणताही विरोध न होता भाजपनं या तीन राज्यांमध्ये तीन नवीन नेत्यांना मुख्यमंत्री केलं.
सध्याच्या भारतीय राजकारणात पंतप्रधान मोदींचं व्यक्तिमत्त्व बहूसंख्य भारतीयांना आवडतं. काहीजण त्यांना 'विश्वगुरू' म्हणून पाहतात. अशा स्थितीत खरगे मोदींना आव्हान देऊ शकतील का?
विजय त्रिवेदी म्हणतात, "सध्याच्या परिस्थितीत मल्लिकार्जुन खरगे मोदींना तगडं आव्हान देऊ शकतील, असं वाटत नाही. मोदी हे लोकप्रिय नेते आहेत. भाजपकडे 40 टक्के मतं आहेत. भाजपचे 80 पेक्षा जास्त ओबीसी खासदार आहेत, त्यांच्या सरकारमध्ये अनेक ओबीसी मंत्री आहेत. ते देशातील सर्वांत मोठा ओबीसी चेहरा आहे."
नरेंद्र मोदींनी स्वत:ला भारतातील एक गरीब माणूस आणि चहावाला म्हणून सादर केलं होतं आणि यातूनच राष्ट्रीय स्तरावर आपला निवडणूक प्रचार सुरू केला होता.
खरगे स्वतःची अशी प्रतिमा निर्माण करू शकतील का?
हेमंत अत्री सांगतात की, "खरगे असं कधी बोलत नाहीत पण त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे सर्वांना माहीत आहे. त्याचा साधेपणा आणि सरळपणा सर्वांनाच माहीत आहे. त्याच्यात अहंकार नाही. मोदींनी सुरुवातीला ज्या पद्धतीनं स्वत:ला सादर केलं आणि आता ते जसे आहेत, हे अगदी विरुद्ध आहे. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी खरगे हेच योग्य व्यक्ती आहेत. खरगे यांच्यावर कोणताही आरोप नाही."
काही लोक असंही मानतात की पीएम मोदींच्या 'लार्जर दॅन लाइफ' प्रतिमेमागे मीडिया आणि मार्केटिंगचा हात आहे.
हेमंत अत्री म्हणतात, "नेता आणि त्यांचं स्थान जाहिरात आणि मार्केटिंगने बनत नाही. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी आपली 'इमेज' तयार करण्यासाठी बराच खर्च केला आहे. अशी छबी निर्माण करणारा नेता जगात क्वचितच असेल. मीडियानं मोदींना प्रस्थापित केलं आहे."
ते म्हणाले, "या दृष्टिकोनातून पाहिलं तर कोणताही नेता मोदींशी स्पर्धा करू शकणार नाही. पण भारतात लोकशाही आहे. भारतात नेते लोकांमधून येतात, जसे मोदी या देशात जनतेतून पुढे आले आहेत, त्याचप्रमाणे खरगे आहेत, देशवासियांना तेही आवडू शकतात. पण आज भारताच्या लोकसंख्येतील एक मोठा वर्ग आहे, जो नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्त्वानं भारावून गेला आहे, हेही खरं आहे. अशा स्थितीत खरगेंनी त्यांना आव्हान देणं सोप जाणार नाही."
Published By- Priya Dixit