राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या आगीत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण घटनेतील मृतांचा आकडा अजूनही वाढत आहे. मृतांमध्ये मोठ्या प्रमाणावर लहान मुलांचाही समावेश आहे.
				  													
						
																							
									  
	 
	आगीच्या या घटनेबाबत चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सुभाष त्रिवेदी यांना या एसआयटीचे प्रमुख बनवण्यात आलं आहे.
				  				  
	 
	या एसआयटीमध्ये एफएसएलचे संचालक आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.कोणत्या विभागानं नेमकं काय केलं याची चौकशी केली जाणार असल्याचं त्रिवेदी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	यासाठी जबाबदार कोण आहे? नेमक्या काय चुका झाल्या? याचा तपास केला जाईल. तसंच भविष्यात असे अपघात होऊ नये म्हणून काय करावे हेही तपासलं जाईल. अपघातात मृत्यू झालेल्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असंही त्रिवेदी म्हणाले.
				  																								
											
									  
	 
	बीबीसीचे सहयोगी पत्रकार बिपिन टंकारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग एवढी भीषण होती की पाच किलोमीटर दूरुनही धुराचे लोट स्पष्टपणे दिसत होते.
				  																	
									  
	 
	गेम झोनमधून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता, त्यामुळं अनेक लोक आत अडकले होते असंही त्यांनी सांगितलं. मॉलच्या गेम झोनमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते, पण स्थानिकांनी शॉर्टसर्किट झाल्याचंही सांगितलं आहे.
				  																	
									  
	अपघाताचे नेमके कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. बीबीसीने घटनास्थळावर उपस्थित असलेले आणि प्रत्यक्षदर्शी यांच्याशी बोलून नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
				  																	
									  
	 
	'कितीही पैसे दिले तरी आता ते लोक परत येतील का?'
	राजकोट येथे गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत 27 जणांचे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतांचे नातेवाईक हे रुग्णालयाबाहेर ताटळकत उभे असल्याचे चित्र दिसत आहे. नातेवाईकांचे मृतदेह आणि बेपत्ता असलेल्या पीडितांची माहिती मिळावी यासाठी हे नातेवाईक रुग्णालयाबाहेर उभे आहेत. रुग्णालयातूनपीडितांची कुठलीच माहिती मिळत नसल्याचे नातेवाईक सांगत आहेत.
				  																	
									  
	 
	कितीही पैसे दिले तरी आता आमचे नातेवाईक परत येतील का असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.
				  																	
									  
	 
	राजकोट येथील रुग्णालय परिसरात बीबीसी गुजरातीचे प्रतिनिधी तेजस वैद्य यांनी फेसबुक लाइव्ह केले. यावेळी त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या नातेवाईकांना प्रश्न विचारले.
				  																	
									  
	 
	त्यावेळी एका नातेवाईकाने आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. त्यावेळी एक नातेवाई म्हणाला, "अशा घटना किती वेळा झाल्या आहेत गुजरातमध्ये. आधी मोरबीत झाली, मग सुरतमध्ये मग आता इथे. दरवेळी घटना घडल्यावर चार चार लाख रुपये दिले जातात. या रुपयांमुळे आमचे लोक परत येणार आहेत का, आज कितीही कोटी रुपये दिले तर ही मुलं जिवंत होणार आहेत का"
				  																	
									  
	 
	"जर मॉलमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते तर त्यांनी मुलांना प्रवेश का दिला?" असे देखील विचारले.
				  																	
									  
	 
	या ठिकाणी आलेले नातेवाईक त्रस्त आहेत. ते माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती हाती आली नाही असे तेजस वैद्य यांनी आपल्या लाइव्ह दरम्यान सांगितले.
				  																	
									  
	 
	'टायरमुळे आग पसरल्याची शक्यता'
	कश्यप भट्ट हे दुर्घटना घडली तेव्हा त्याठिकाणी उपस्थित होते. बीबीसी गुजरातीशी बोलताना ते म्हणाले की, “आम्ही याठिकाणी पोहोचलो तेव्हा आसपासच्या सोसायटीतील लोक बचाव कार्यासाठी आलेले होते. गेम झोनमध्ये टायरचा वापर करून मार्गाची सीमा तयार करण्यात आलेली होती, त्यामुळं ही आग जास्त पसरली."
				  																	
									  
	 
	“गेम झोनच्या वरच्या मजल्यावर असलेल्या बॉलिंग झोनमध्ये जाण्यासाठी आणि येण्यासाठी एकच मार्ग होता. पण कदाचित गोंधळ आणि चेंगराचेंगरीमुळं हा रस्ता बंद झाला असावा. त्यामुळं कदाचित मृत्यू जास्त झाले असावेत,"असंही भट्ट म्हणाले.
				  																	
									  
	 
	याठिकाणी सायंकाळी 5.45 वाजेपासून उपस्थित असणारे एकजण म्हणाले की, “ सांगण्यात येणारा मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. कारण मी स्वतः 30 पेक्षा जास्त मृतदेह पाहिले. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून आरोपींना अटक करावी."
				  																	
									  
	 
	"गुजरातमध्ये जीवाची किंमत फक्त चार लाख"
	ही दुर्घटना घडली त्यावेळी दिलिपसिंह वाघेला हे नाना मवा रोडवरून जात होते. आग लागली त्यावेळी लगेच घटनास्थळी पोहोचले.
				  																	
									  
	 
	बीबीसीबरोबर बोलताना ते म्हणाले की, "मी या रस्त्यावरून जात होतो तेव्हा मला धुराचे लोट दिसले. त्यामुळं कुठं आग लागली आहे, हे पाण्यासाठी मी या ठिकाणी आलो. इथे पोहोचल्यावर मला आगीच्या ज्वाळा दिसल्या."
				  																	
									  
	 
	"भीषण आग असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्यामुळं मी याठिकाणीच थांबलो. त्यावेळी पोलिसांच्या दोन गाड्या आणि दोन 108 रुग्णवाहिका इथं उभ्या होत्या. मात्र, अग्निशमन दलाची एकही गाडी तोपर्यंत आलेली नव्हती. अग्निशमन दलाच्या गाडीला पोहोचायला सुमारे 45 मिनिटे लागली," असं वाघेला यांनी म्हटलं.
				  																	
									  
	 
	वाघेला यांनी त्यांच्या मोबाईलमधली आगीची दृश्ये आम्हाला दाखवली.
	“मी हा व्हिडिओ जवळपास 5.50 वाजता रेकॉर्ड केला. तोपर्यंत अग्निशमन दलाचे वाहन याठिकाणी पोहोचलेले नव्हते. याठिकाणी खूप लोक जमले होते, पण आगीच्या जवळ जाता येण्यासारखी स्थितीच नव्हती.
				  																	
									  
	 
	"जोराचा वारा आणि याठिकाणी खूप टायर असल्यानं आग प्रचंड प्रमाणात पसरत गेली. सिलिंगला थर्माकॉल शीटही लावण्यात आले होते. त्यामुळं आगीनं आणखी रुद्र रूप धारण केलं," असं वाघेला म्हणाले.
				  																	
									  
	 
	त्यांनी या घटनेची तुलना मोरबीमधील पूल दुर्घटना आणि सूरतमधील तक्षशिला कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेशी केली.
				  																	
									  
	 
	या ठिकाणी आगीच्या घटनांसंदर्भातील सुरक्षा उपकरणं बसवण्याचं काम अद्याप सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.
				  																	
									  
	“लोकांच्या जीवाशी खेळणं ही यंत्रणेची सवयच बनली आहे. जेव्हा अशाप्रकारची घटना घडते तेव्हा या यंत्रणेकडून फक्त भावना आणि दुःख व्यक्त केलं जातं. मानवी जीवनाचं मूल्य गुजरातमध्ये फक्त चार लाख रुपये आहे. मुख्यमंत्री किंवा सरकारी यंत्रणा जेव्हा चार लाख रुपयांची मदत जाहीर करते तेव्हा जणू त्यांचा आत्मा तृप्त होतो," वाघेला म्हणाले.
				  																	
									  
	 
	गो कार्टिंग किती धोकादायक? नेत्यांनीच दाखवले
	राजकोटमधील आम आदमी पार्टीच्या ट्रेड युनिटचे अध्यक्ष शिवलाल बरसिया यांनी गो कार्टिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कार ड्रायव्हिंगच्या गेममधील धोक्यांच्या संदर्भात माहिती दिली.
				  																	
									  
	 
	"ही अत्यंत दुःखद घटना असून मृतांचा आकडा वाढू नये, अशी प्रार्थना करुया. मॉलचे मालक आणि यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष हे घटनेसाठी कारणीभूत आहे," असं बरसिया म्हणाले.
				  																	
									  
	 
	त्यांनी नेमका धोका काय तेही प्रत्यक्ष दाखवले. "मी तुम्हाला एक कार्ट दाखवतो. या कार्टच्या तळाशी रबरी जाळी आहे. मुले एकमेकांबरोबर खेळताना दोन गाड्या एकमेकांवर घासतात तेव्हा ठिणग्या उडतात. मुलं बसलेली असतात त्याठिकाणी त्यांच्या मांडीच्या वरच पेट्रोलची टाकी असते. अशा स्थितीत आग लागायला किती वेळ लागणार?" असंही त्यांनी म्हटलं.
				  																	
									  
	 
	"अशा गाड्यांना परवानगी कोणी दिली? यंत्रणेला या प्रकाराची माहिती नाही का? हा खरं म्हणजे गुन्हा आहे आणि अग्निशमन विभागासह प्रत्येक संबंधित विभागाला कलम 302 लावायला हवं. तसं झालं तरच या यंत्रणेत सुधारणा होईल," असंही ते म्हणाले.
				  																	
									  
	 
	गेम झोनबाबत वारंवार तक्रारी
	केतनसिंह परमार गेम झोनजवळच्या एका सोसायटीमध्ये राहतात. “आम्ही दर आठवड्याला या गेम झोनबद्दल तक्रार करत होतो. याबाबत आयुक्तांना ईमेलही केला होता. पण इथे रात्री एक वाजताही लोक कार्ट चालवायचे. पाच-सहा मुलं घेऊन लोक आले आणि त्यांनी पैसे दिले तर रात्रीही ते गेम झोन सुरू करायचे," असं त्यांनी सांगितलं.
				  																	
									  
	आम्ही आमच्या मुलांना कधीही या गेमझोनमध्ये पाठवलं नाही, एवढा तो खराब आहे. आम्ही त्याबाबत अनेक तक्रारीही केल्या होत्या असंही परमार म्हणाले.
				  																	
									  
	 
	कधी सुरू झाली आग?
	राजकोटमधील मवा रोडवर असलेल्या या गेम झोनमध्ये शनिवारी दुपारी साडेचार वाजता आग लागली होती.
				  																	
									  
	 
	साडेचारच्या सुमारास नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर अग्निशमन विभागाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
				  																	
									  
	 
	मात्र, वाऱ्याच्या वेगामुळं आग भडकली आणि त्यामुळं तात्पुरत्या स्वरूपात उभ्या इमारती कोसळल्या आणि अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले.
				  																	
									  
	 
	राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने मृतांना मदत जाहीर केली असून एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
				  																	
									  
	 
	Published By- Priya Dixit