शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (21:31 IST)

चुकीचा नंबर डायल झाला; पाकिस्तानी गुलजार आणि भारतीय दौलतची प्रेमकहाणी सुरू झाली

love hands
दौलत आणि गुलजार यांच्या प्रेमाची ही गोष्ट एखाद्या बॉलिवूड चित्रपटालाही लाजवेल अशीच आहे. योगायोगाने एक चुकीचा नंबर डायल झाल्याने या गोष्टीची सुरुवात झाली होती.
 
सीमा हैदर आणि अंजू ही नावं तुम्ही नक्कीच ऐकली किंवा वाचली असतील. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सध्या या प्रेमकहाण्या प्रचंड व्हायरल होत आहेत आणि अशातच आता आंध्र प्रदेशच्या सीमेवरून आणखीन एक अशीच गोष्ट समोर आलीय.
 
या गोष्टीमध्ये दोन प्रमुख पात्रं आहेत. पहिले पात्र आहे पाकिस्तानच्या गुलजार खानचे तर दुसरे पात्र आहे भारताच्या दौलत बीचे.
 
आंध्र प्रदेशच्या नंदयाल जिल्ह्यातल्या गादी वेमुला गावात त्यांच्या पाच मुलांसह सध्या ते आनंदाने संसार करत आहेत.
 
2011 मध्येच गुलजार खान भारतात आले होते मात्र त्यानंतर आठ वर्षांनी नागरिकतेशी संबंधित विविध आरोपांमुळे त्यांना दोनदा तुरुंगवारी करावी लागली आहे. गेल्या महिन्यात तेलंगणा उच्च न्यायालयाने गुलजार यांच्या हद्दपारीचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते.
 
'मला गुलजार एक चांगला माणूस वाटले होते'
गुलजार खान आणि दौलत बी यांच्या प्रेमाची ही गोष्ट सुरु झाली 2009 मध्ये. पाकिस्तानच्या पंजाबात असणाऱ्या सियालकोटचे रहिवासी असणारे गुलजार पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून सौदी अरेबियामध्ये काम करत होते.
 
त्यांनी बीबीसीला बोलताना सांगितलं की त्यावेळी ते काही महिन्यांपासून भारतात सुट्टीवर गेलेल्या त्यांच्या एका साथीदाराला फोनवरून संपर्क करत होते.
 
गुलजार यांचा त्या साथीदाराशी फोनवरून संपर्क होत नव्हता त्यामुळे त्यांना वाटलं की कदाचित त्यांनी चुकीचा नंबर नोंदवून घेतला असेल आणि त्यामुळेच त्यांनी त्याच नंबरसारख्या इतर काही फोन नंबरवर फोन लावायला सुरुवात केली.
 
असे वेगवेगळे नंबर वापरून कॉल करण्याचा प्रयत्न करत असताना त्यातलाच एक कॉल भारतात एका शाळेत काम करणाऱ्या दौलत बी यांना लागला.
 
गुलजार यांनी फोनवरून दौलत बी यांना सांगितलं की, त्यांचं नाव गुलजार खान आहे आणि ते पाकिस्तानच्या पंजाबमध्ये राहतात. त्यांच्यात सुरु झालेल्या या संवादाचं रूपांतर पुढे प्रेमात झालं.
 
या दोघांचा हा संवाद त्यानंतर पुढे तीन वर्षं सुरूच राहिला आणि अखेर गुलजार यांनी दौलत यांना लग्नाची मागणी घातली. त्याकाळी दौलत बी मानसिक ताणतणावाचा सामना करत होत्या.
 
दौलत बीबीसीला बोलताना म्हणाल्या की, "मी त्यांना अनेकदिवस असं खोटंच सांगत राहिले की माझं लग्न झालंय, मला चार मुलं आहेत. हे ऐकून ते म्हणाले की मला तुझ्या पती आणि मुलांशी बोलायचं आहे."
 
मात्र सत्य हेच होते की दौलत बी यांच्या पतीचा काही काळ आधी मृत्यू झाला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना गुलजार एक चांगला माणूस वाटले आणि हळूहळू त्यांना ते आवडू लागले आणि दौलत बी गुलजार यांना त्यांचा साथीदार म्हणून पाहू लागल्या.
 
दौलत बी म्हणतात की, "मी गुलजार यांना सांगितलं की लोक इथे मला टोमणे मारतात. त्यापेक्षा मी मरून जाईन. पण ते म्हणाले की मी लवकरच तिथे येणार आहे आणि तू माझ्यासाठी का होईना पण मरू नको."
 
यानंतर गुलजार यांनी जे काही केले ते बेकायदेशीर होते आणि त्यांना त्याची पुरेपूर कल्पना होती. त्यांनी स्वतःच हे मान्य केलंय.
 
गुलजार म्हणतात की दौलत बी यांच्याशी लग्न करायला त्यांनी भारत सरकारकडे अनेकवेळा व्हिसा मिळावा म्हणून अर्ज केला पण यामध्ये त्यांना एकदाही यश आलं नाही.
 
गुलजार भारतात कसे पोहोचले?
याबाबत बोलताना गुलजार यांनी सांगितलं की यासाठी त्यांनी एका ओळखीच्या भारतीय नागरिकाचे ओळखपत्र मिळवले आणि स्थानिक पोलिसांकडे जाऊन त्यांनी ते स्वतः भारतीय असल्याचा दावा केला.
 
ते म्हणतात की, "मी त्यांना म्हणालो की हे माझे ओळखपत्र आहे आणि मी एक भारतीय नागरिक आहे. मला भारतात परत जायचे आहे आणि मी नोकरीसाठी सौदी अरेबियामध्ये आलो होतो."
 
त्यांनी हे सांगितल्यावर सौदी अरेबियाच्या पोलिसांनी त्यांना तुरुंगात टाकले आणि यामुळे त्यांना 12 दिवस तुरुंगातही ठेवण्यात आलेलं होतं.
 
गुलजार म्हणतात की सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने त्यांना तात्पुरता पासपोर्ट जारी केला आणि सुमारे 160 लोकांसह मुंबईला पाठवले.
 
गुलजार यांची त्याआधीही भारतात जाण्याची इच्छा होती. पाकिस्तानात असतांना त्यांनी पाहिलं होतं की अनेक भारतीय व्हिजिट व्हिसाचा वापर करून पाकिस्तानात यायचे. मात्र स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुलजार यांना बेकायदेशीर मार्ग वापरावा लागला.
 
भारतीय पोलिसांचं असं म्हणणं आहे की, खोटी कागदपत्रे वापरून गुलजार भारतात आले होते. न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, गुलजार यांनी इक्बालपूर येथील रहिवासी असणारी मोहम्मद आदिल यांची बनावट कागदपत्रे वापरली होती असं सरकारचं म्हणणं आहे.
 
मोहम्मद आदिल यांच्या कागपत्रांचा चुकीचा वापर करण्यात आला. एक आपात्कालीन प्रमाणपत्र मिळवलं आणि गुलजार 10 जानेवारी 2011ला भारतात पोहोचले.
 
विशेष म्हणजे गुलजार हेदेखील त्यांच्यावर झालेले आरोप नाकारत नाहीत.
 
मी स्वतःला भारतीय समजू लागलो होतो
 
मुंबईच्या विमानतळावर उतरल्यावर त्यांनी दौलत बी यांच्या घरापासून सगळ्यात जवळ असणाऱ्या हैद्राबादला जाण्यासाठी रेल्वे पकडली.
 
ते म्हणतात की, "त्यावेळी माझ्याकडे फक्त 150 रियाल होते आणि मुंबईच्याच विमानतळावर मी ते भारतीय रुपयांमध्ये बदलून घेतले आणि मी दौलत बी यांच्या घरी पोहोचलो तेंव्हा माझ्या खिशात फक्त पाचशे रुपये शिल्लक होते."
 
भारतात आल्यावर दोन आठवडयांनी गुलजार यांनी दौलत बी यांच्याशी लग्न केलं. यापूर्वी एकदा दौलत बी यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुलजार यांची चौकशी केली पण त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले आणि गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
 
दौलत बी यांच्यासाठी गुलजार हे एका देवदूतासमान धावून आले. दौलत बी यांच्या आई वडील, मोठा भाऊ आणि पतीचा एकापाठोपाठ एक मृत्यू झाला होता आणि लहान भाऊ मानसिक तणावामुळे कुठेतरी निघून गेला होता.
 
दौलत बी यांच्या म्हणण्यानुसार त्यांना गुलजार यांच्यामध्ये एक आदर्श पती दिसत होता कारण गुलजार यांनी त्यांच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलांना स्वतःच्या मुलांप्रमाणे मानले आणि त्यांची वागणूकही दौलत बी यांना आवडली होती.
 
दिवसांमागून दिवस जात राहिले हळू हळू तेथील लोक गुलजार यांना ओळखू लागले आणि काही वर्षांमध्ये या दोघांना चार मुलंही झाली. यादरम्यान त्यांनी थोड्याफार प्रमाणात तेलगू भाषा शिकून घेतली. ते देशी दारू पिऊ लागले आणि पेंटर म्हणून पुन्हा एकदा तिथे कामाला सुरुवात केली.
 
गुलजार म्हणतात की, "ते स्वतःदेखील स्वतःला भारतीय समजू लागले होते."
 
दौलत बी यांनीच त्यांच्या पतीची ओळख सगळ्यांना सांगितली
रावळपिंडीत राहत असलेल्या गुलजार यांची मोठी बहीण शीला लाल यांनी बीबीसीला सांगितले की,"त्यांच्या भावाने अनेक वर्षांपासून कुटुंबाशी संपर्क तोडला होता."
 
त्यांचं म्हणणं होतं की त्यांचा भाऊ नेमका कोणत्या परिस्थितीत आहे याची त्यांना काहीही कल्पना नव्हती. तसेच त्यांना नेहमी अशी भीती वाटायची की त्याच्यासोबत एखादा अपघात घडला असेल.
 
त्यांनी सांगितले की, गुलजार हे सौदी अरेबियात आहेत, असं त्या कुटुंबीयांना वाटत होतं, त्यामुळं त्यांनी सौदी अरेबियामध्ये त्यांचा शोध सुरू ठेवला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी गुलजारला शोधण्यासाठी त्यांच्या एका भावाला सौदी अरेबियालाही पाठवले पण त्यांना शोधण्यात त्याला यश आले नाही.
 
पण नंतर अचानक एके दिवशी गुलजार यांनी पाकिस्तानातील त्यांच्या आई आणि कुटुंबाशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितले की "मी भारतात पोहोचलो आहे."
 
अनेक वर्षं घरापासून दूर राहिल्यानंतर त्यांना आता त्यांच्या कुटुंबीयांची आठवण येऊ लागली होती. त्यांनी केवळ स्वतःच कुटुंबियांशी संवाद साधला नाही तर दौलत बी आणि त्यांच्या मुलांनाही गुलजार यांच्या कुटुंबियांना बोलायला लावले. गुलजार यांना वाटत होतं की त्यांनी त्यांच्या या नवीन कुटुंबाला घेऊन पाकिस्तानात निघून जावं.
 
2019 मध्ये, गुलजार आपल्या पत्नी आणि मुलांसह पाकिस्तानला जाण्याच्या इराद्याने दिल्लीला रवाना झाला, परंतु तेलंगणा पोलीस हैदराबाद रेल्वे स्थानकावर त्यांची वाट पाहत असल्याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती.
 
तिथेच गुलजार यांना लगेच अटक करण्यात आली.
 
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी बोलण्यास नकार दिला आहे, परंतु 'द वीक' या वेबसाइटनुसार, गुप्तचर संस्था पाकिस्तानमध्ये त्यांच्यामार्फत होणाऱ्या कॉल्सवर लक्ष ठेवून होत्या.
 
कोठडीत पोलिसांनी त्यांना त्यांच्या देशाबद्दल प्रश्न विचारले आणि त्यानंतर गुलजार यांनी ते पाकिस्तानी नागरिक असल्याची कबुली दिली.
 
गुलजार म्हणतात की, "मी त्यांना सर्व काही प्रामाणिकपणे सांगितले. मात्र त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही, तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी तुमच्यापासून काही अंतरावर लघवी करत होतो आणि तेंव्हाच पाहिलं की तुम्ही माझ्या कुटुंबाची चौकशी करत आहात. जर मी चुकीचा माणूस असतो तर तिथूनच पळून गेलो असतो पण मी पळालो नाही आणि तुमच्याकडे आलो."
 
ते म्हणाले, "मी प्रेम केलं आणि विचार केला आता जे होईल ते होईल."
 
बनावट आधार कार्ड आणि पासपोर्ट मिळवण्यासाठी भारतीय दंड संहिता (IPC), विदेशी कायदा आणि पासपोर्ट कायद्याच्या विविध कलमांखाली गुलजार यांच्यावर आरोप ठेवण्यात आले आहेत.
 
ते म्हणतात की, "मी चूक केली आहे आणि मला त्याची शिक्षा मिळत आहे त्यामुळे माझी कसलीच तक्रार नाही."
 
यादरम्यानच पोलिसांनी दौलत बी यांना त्यांचे पती पाकिस्तानचे नागरिक असल्याचं सांगितलं. हे ऐकून दौलत बी पोलिसांशी भांडू लागल्या त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचे पती पाकिस्तानी नसून पंजाबचे आहेत.
 
पोलिसांनी त्यानंतर त्यांना समजावलं की पाकिस्तानातही एक पंजाब आहे आणि त्यांचे पती पाकिस्तानच्याच पंजाबचे रहिवासी आहेत."
 
त्यावेळी त्यांना कळले की गुलजार हे पाकिस्ताच्या पंजाबमधील सियालकोट जिल्ह्यातल्या कोलुवाल गावात राहतात आणि ते ख्रिश्चन आहेत.
 
दौलत बी यांना त्यावेळी कळलं की त्यांचे पती मुस्लिम नाही आणि 'खान' हे त्यांचं आडनाव असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळेच दौलत बी यांना वाटलं की ते मुस्लिम धर्मीय आहेत. मात्र गुलजार यांनी त्यांचं नाव गुलजार मसीह असल्याची माहिती दौलत बी यांच्यापासून लपवून ठेवली होती.
 
शीला यांनी बीबीसीला सांगितलं की, जेव्हा गुलजार यांच्यावर भारतात गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा त्यांनी पाकिस्तान सरकारकडे संपर्क साधला, ज्यावर सरकारने या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं सांगितलं. यानंतर पोलीसही त्यांच्या घरी चौकशीसाठी गेले.
 
इकडे दौलतही घरी परतल्या आणि त्यांनी गुलजार यांच्या जामिनासाठी गावकऱ्यांकडून एकूण दीड लाख रुपये जमा केले.
 
त्यांना तेव्हा जामीन मिळाला पण त्यानंतर भारतात घुसखोरी केलेल्यांच्या विरोधात आणखीन एक मोहीम सुरु करण्यात आली आणि त्यांना पुन्हा अटक झाली. त्यानंतरही दौलत यांनी गुलजार यांच्या सुटकेसाठी तब्बल ऐंशी हजार रुपये जमा केले.
 
गुलजार यांना दुसऱ्यावेळी झालेल्या अटकेच्या विरोधात ते उच्च न्यायालयात गेले आणि मग उच्च न्यायालयाने त्यांची सुटका केली.
 
आता गुलजार यांना पाकिस्तानात परत पाठवल्यास त्यांना पत्नी आणि मुलांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी द्यावी, अशी इच्छा आहे.



Published By- Priya Dixit