मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

देशातील प्रत्येक दुसरा तरुण हा मोबाईलच्या आधीन

देशातील प्रत्येक दुसरा तरुण हा मोबाईलच्या अधीन झाला असून तरुणांना मोबाईलचे व्यसनच लागले आहे. मोबाईलच्या या व्यसनामुळे कौटुंबिक व सामाजिक जीवन गुंतागुंतीचे झाले आहे, असा धक्कादायक खुलासा दिल्लीतील एम्स रुग्णालयाने आपल्या अहवालात केला आहे.
 
मोबाईलचा कौटुंबिक व सामाजिक आयुष्यावर होणारा परिणाम यावर एम्स रुग्णालयात नुकतेच संशोधन करण्यात आले. यावेळी १३. ४ टक्के व्यक्तींनी मोबाईलमुळे त्यांचे सामाजिक व कौटुंबिक जीवन विस्कळीत झाल्याचे मान्य केले. मोबाईलमुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण झाला असून एकमेकांबद्दल असलेली आपुलकीही कमी होत आहे. व्यक्तींमधले संभाषणच खुंटले आहे. यात तरुणांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय मेळाव्यात 817 व्यक्तींवर संशोधन करण्यात आले होते. यातील दोन तृतियांश व्यक्ती पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होत्या. 32 ते 35 वर्ष वयोगटातील या व्यक्तींना एखाद्याशी प्रत्यक्ष संवाद करण्यापेक्षा मोबाईल मेसेजवर संवाद साधणे जास्त सोयीस्कर वाटत होते. यामुळे त्या सतत मोबाईलमध्येच व्यस्त होऊ लागल्याचे या संशोधनात समोर आले. तर 56 टक्के व्यक्ती कामापुरताच मोबाईलचा वापर करत असल्याचे स्पष्ट झाले. मोबाईलच्या व्यसनातून बाहेर येण्यासाठी 15 टक्के व्यक्तींना मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागल्याचे एम्सने अहवालात म्हटले आहे. तर 19.4 टक्के व्यक्ती मोबाईल व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ते शक्य होत नसल्याने ते आता मानसोपचार तज्ज्ञांचा मदत घेण्याचा विचार करत आहेत. 19.7 टक्के नागरिकांच्या मते दिवसभर मोबाईलमध्ये गुंतल्याने आयुष्यातील इतर महत्वाच्या गोष्टींकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. याचे सामाजिक व कौटुंबिक जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशाराही या अहवालात संशोधकांनी दिला आहे.