शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By वेबदुनिया|

महानवमी व कुमारीका भोजन

नवरात्रीचे व्रत करणारे भक्त नवमीच्या दिवशी कुमारीकाना भोजन देऊन व्रत पूर्ण करत असतात. दोन वर्षांच्या बालिकेला कुमारी, त्यापेक्षा अधिक व तीन वर्षांपेक्षा लहान -त्रिमूर्ति, त्यापेक्षा अधिक व चार वर्षांपेक्षा लहान -कल्याणी, त्यापेक्षा अधिक व पाच वर्षांपेक्षा लहान -रोहिणी, त्यापेक्षा अधिक व सहा वर्षांपेक्षा लहान - कालिका, त्यापेक्षा अधिक व सात वर्षांपेक्षा लहान- चंडिका, त्यापेक्षा अधिक व आठ वर्षांपेक्षा लहान- शांभवी, त्यापेक्षा अधिक व नऊ वर्षांपेक्षा लहान- दुर्गा व दहा वर्षांच्या बालिकेला -सुभद्रा अशा विविध नावांनी संबोधले जाते.

या वयोगटातील बालिकाना नवमीला आमंत्रित करून त्यांचे पाय धुऊन त्यांना आसन किंवा पाटावर बसवून त्यांचे विधीवत पूजन केले जाते. त्यानंतर यथाशक्ती वस्त्र, अलंकार, पुष्प, माळा, सुगंधित तेल, चंदन, कुंकू, काजळ, अत्तर आदी वस्तू भेट दिल्या जातात. शक्यतो वरील वस्तू परिधान करून त्यांना पाटावर बसवून भोजन द्यावे.

भोजनानंतर फळे व दक्षिणा देऊन त्यांना घराच्या उंबरठ्यापर्यंत सोडायला जावे. कुमारीकांना देण्यात येणार्‍या भोजनात एक-दोन गोड पदार्थ करावेत. भोजन सुरू असताना दिवा प्रज्वलित ठेवावा. कुमारीकांना उपासकाने स्वत: वाढले पाहिजे. कुमारीका भोजनाला भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असून त्याला महापूजा देखील म्हटले आहे.

उपासकाने मोठ्या श्रध्देने कुमारीकांना भोजनास बोलावले पाहिजे. मनात कुठल्याही प्रकारचा आवेश, क्रोध ठेवायला नको. कुमारीका लहान असल्याने त्यांच्याकडून पाणी सांडणे, उष्टे पाडणे या गोष्टी देवीच्या लीला समजून त्याकडे दुर्लक्ष करून श्रध्देने नवरात्र व्रत केले पाहिजे.