गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Modified: रविवार, 19 जून 2016 (20:11 IST)

नवा स्मार्टफोन घेताय? महिनाभर थांबा!

नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय?. जरा थांबा! कारण. नवीन स्मार्टफोन घेतल्यानंतर त्याची किंमत साधारणत: महिनाभरात निम्म्यावर येते. किमतीतील ही घसरण कारच्या किमतीपेक्षाही अधिक असल्याचे आश्चर्यकारक अनुमान एका अभ्यासात काढण्यात आले आहे. 
 
एखादी नवी कार घेतल्यानंतर साधारणत: वर्षभरात तिच्या किमतीत 20 टक्क्यांची घट होते. मात्र, नवा स्मार्टफोन घेतल्यानंतर साधारणत: महिनाभरातच त्याच्या किमतीत 65 टक्क्यांची घट होत असल्याचा निष्कर्ष ‘म्युझिकमॅगपाय डॉट को डॉट यूके’या वेबसाइटने अभ्यासाअंती काढला आहे. या निष्कर्षाला ‘अँपल’चा ‘आयफोन’ मात्र अपवाद ठरला आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोच्या तुलनेत ‘आयफोन’विकत घेतल्यानंतर स्वत:चा भाव कायम ठेवण्यात यशस्वी ठरल्याचेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. 
 
बाजारात सादर होऊन पाच वर्षाचा कालावधी उलटूनही ‘आयफोन फोर एस’च्या किमतीत 61 टक्क्यांनी घट झाली आहे, तर वर्षभरानंतर ‘आयफोन सिक्स’ची (16जीबी) किंमत पन्नास टक्क्यांनी घटली आहे. त्या तुलनेत ‘आयफोन फाइव्ह’च्या किमतीत सादरीकरणानंतर आठ महिन्यांनी 66 टक्क्यांची   घट नोंदविण्यात आल्याचेही अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे. बाजारात सादर होऊन केवळ दोनच महिने झालेल्या ‘सॅमसंग’च्या ‘गॅलेक्सी एस फोर’च्या किमतीतही जवळपास निम्मी घट झाली आहे. दाखल होतेवेळी या स्मार्टफोनची किंमत 579 पौंड होती. मात्र, आता हा फोन 279 पौंडातच उपलब्ध आहे.
 
ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड असणार्‍या स्मार्टफोनमध्ये किमतीचा सर्वाधिक फटका एचटीसी वन एम नाइन या स्मार्टफोनला बसला आहे. मार्च 2015 मध्ये 579 पौंडांना असणार्‍या या फोनच्या किमतीत एक.दोन नव्हे तर 65 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. 
 
स्मार्टफोनच्या बाजारात दररोज नवनवीन फोन, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह आणि एकापेक्षा एक सरस डिझाइनमध्ये सादर होत असल्याने किमतीत घट होत असल्याचेही ‘म्युझिकमॅगपाय डॉट को डॉट यूके’ने स्पष्ट केले आहे. 
 
शिवाय ठरावीक स्मार्टफोनला असणारी नियमित मागणीही अन्य स्पर्धक कंपन्यांच्या स्मार्टफोनच्या मागणीवर आणि किमतीवर प्रभाव टाकत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.