शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जुलै 2024 (17:09 IST)

मनू भाकरने केलेला 'तो' फोन कॉल ज्यामुळे तिनं जिंकलं ऑलिंपिक पदक

manu bhakar
मनू भाकरनं मंगळवारी (30 जुलै) पॅरिस ऑलिंपिकमध्ये इतिहास घडवला आहे. एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदकं पटकावणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरली आहे.
मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत महिलांच्या गटात कांस्य पदक जिंकून भारतासाठी पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदकांचं खातं उघडलं होतं. त्यानंतर तीनच दिवसांच्या आता मनूनं भारतासाठी दुसरं पदक जिंकलं आहे.
मनू भाकर आणि सरबजोत सिंह या दोघांनी ओ ये जिन आणि ली वून्हो या कोरियन प्रतिस्पर्धी जोडीला 16-10 अशा गुणफरकानं हरवलं.
कोरियन जोडीतील ओ ये जिन हिने रविवारी (28 जुलै) 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत महिलांच्या गटात सुवर्ण पदक जिंकलं होतं. जिन या ऑलिंपिकमध्ये चांगलीच फॉर्ममध्ये आहे. तिने सुवर्ण पदक पटकावताना नवीन ऑलिंपिक विक्रम केला होता.
मात्र मिश्र सांघिक नेमबाजीत मनू भाकर -सरबजोत सिंह यांच्या जोडीनं कोरियन जोडीवर मात केली.
मनू आणि सरबजोत यांनी या महत्त्वाच्या सामन्यात आधीच्या सामन्यांपेक्षा उजवी कामगिरी केली.
 
मंगळवारी 'स्टिल आय राईज' या आत्मविश्वासानं स्वत:वर नियंत्रण ठेवत मनूनं इतिहास घडवला.
 
28 जुलैला ऑलिंपिक खेळांच्या इतिहासात नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू बनली होती.
 
त्यानंतर फक्त तीन दिवसांच्या आत एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदकं मिळवणारी ती भारताच्या ऑलिंपिकच्या इतिहासातील एकमेव खेळाडू बनली आहे.
तसं पाहता भारतासाठी कुस्तीगीर सुशील कुमार आणि बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधू यांनी प्रत्येकी दोन पदकं जिंकलेली आहेत. मात्र त्यांनी ही पदकं दोन वेगवेगळ्या ऑलिंपिक स्पर्धेत जिंकली होती.
 
2008 च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये सुशील कुमारनं कांस्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर 2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये त्याने कामगिरी सुधारत रौप्य पदक पटकावलं होतं.
 
तर पी. व्ही. सिंधूनं 2016 च्या रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक पटकावलं होतं. त्यानंतर 2020 च्या टोकियो ऑलिंपिकमध्ये तिने कांस्य पदक जिंकलं होतं.
 
बीबीसी 'इमर्जिंग प्लेयर ऑफ द ईयर 2020' म्हणजे सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. त्यावेळेस मनूनं इच्छा व्यक्त केली होती की तिला देशासाठी जास्तीत जास्त पदकं जिंकायची आहेत.
मनूनं आपल्या भाषणात म्हटलं होतं की, "मला कळालं की तुम्ही लाईफ टाइम अचीव्हमेंट पुरस्कारासह (जीवनगौरव पुरस्कार) इमर्जिंग इंडियन स्पोर्ट्सवूमनचा पुरस्कार देत आहात, तेव्हा मला खूपच छान वाटलं."
 
मनू भाकर म्हणाली होती, "लाईफ टाइम अचीव्हमेंट पुरस्कारासाठी तुम्हाला प्रदीर्घ काळ चांगली कामगिरी करून दाखवावी लागते. बरंच काही साध्य करावं लागतं. तेव्हा कुठे हा सन्मान तुम्हाला मिळतो. मात्र इमर्जिंग पुरस्कार त्यांना मिळतो, जे चांगली कामगिरी करू शकतात. जे देशासाठी जास्त पदकं जिंकू शकतात."
भारतीय महिला खेळाडू आणि त्यांच्या कामगिरीचं कौतुक करणं, त्याचा सन्मान करणं, महिला खेळाडूंसमोर असलेल्या आव्हानांवर चर्चा करणं आणि त्यांच्या माहित असलेल्या आणि समोर न आलेल्या कहाण्या जगासमोर आणणं हा 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द ईयर' चा उद्देश आहे.
 
साहजिकच 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द ईयर' पुरस्काराच्या या कार्यक्रमात मिळालेला सन्मान आणि आपलं ध्येय यांना मनू भाकरनं एकाच सूत्रात गुंफलं होतं.
 
कमबॅकची जबरदस्त कहाणी
तसं पाहता मनू भाकरची वाट खडतर होती. पॅरिस ऑलिंपिकमधील तिचं यश म्हणजे अपयशानंतर जबरदस्त कमबॅक करण्याची कहाणी आहे.
 
2020 ऑलिंपिक (2021 मध्ये टोकियोत आयोजित करण्यात आलेलं ऑलिंपिक) मध्ये मनू भाकरकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्या अपेक्षांच्या ओझ्याखाली 19 वर्षांच्या मनूचा आत्मविश्वास डळमळीत झाला. ती पदकापासून लांबच राहिली. कोणत्याही प्रकारात ती पदकाच्या फेरीपर्यत पोहोचू शकली नाही. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता.
 
अपयशाची निराशा आणि अपेक्षाभंगाच्या पार्श्वभूमीवर मनू भाकरचं मन नेमबाजीत रमत नव्हतं. बॉक्सिंग, अॅथलेटिक्स, स्केटिंग, ज्युडो आणि कराटेसारख्या खेळांनंतर वयाच्या 14 व्या वर्षी ती नेमबाजीकडे वळली होती.
 
2016 मध्ये जेव्हा मनूनं ठरवलं की नेमबाजीवरच लक्ष्य केंद्रित करायचं तेव्हा मरीन इंजिनीअर असलेल्या तिच्या वडिलांनी, रामकिशन भाकर यांनी नोकरी सोडली. आपल्या मुलीची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिवसरात्र एक केले.
 
पाच वर्षांच्या आतच मनूनं चांगलं यश कमावलं होतं. 2017 च्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत (नॅशल शूटिंग चॅम्पियनशिप) तिने 10 मीटर एअर पिस्टलमध्ये जगात नंबर वन राहिलेल्या हिना सिद्धूला हरवलं होतं.
2018 मध्ये महिला विश्वचषकात (वूमन्स वर्ल्ड कप) मनूनं एकाच दिवसात दोन सुवर्णपदकं जिंकली होती. ही काही सोपी गोष्ट नव्हती. मनूनं 10 मीटर एअर पिस्टल मध्ये सुवर्णपदक जिंकताना दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या मेक्सिकोच्या अलजांद्रा जवालाचा पराभव केला होता.
 
2019 मध्ये मनूनं टोकियो ऑलिंपिकमध्ये स्थान पटकावलं होतं. या सर्व यशामुळे तिच्यात थोडा अॅटिट्यूड देखील आला होता. मात्र नेमबाजीच्या क्षेत्रात तिचं नाव तळपत राहिलं.
 
टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंवर लक्ष ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं लक्ष मनू भाकरवर होतं. मात्र एका प्रकारात तिच्या पिस्तलमध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर संपूर्ण ऑलिंपिकमध्ये तिची कामगिरी ढेपाळली. त्याचबरोबर अॅटिट्यूडनं त्यात भर पडली.
 
अपेक्षांच्या लाटांवर स्वार असलेल्या मनू भाकरला आपलं अपयश पचवता आलं नाही. त्यामुळे आपल्या अपयशाचा खापर तिनं तत्कालीन प्रशिक्षक जसपाल राणा यांच्या माथी फोडलं. माजी नेमबाज राणा यांनी ही मनूची अपरिपक्वता आहे असं म्हटलं आणि दोघांचेही मार्ग वेगवेगळे झाले.
 
यानंतर मनू भाकरचं खेळातील लक्ष कमी होत गेलं. प्रसारमाध्यमांना दिलेल्या अनेक मुलाखतीत तिने मान्य केलं आहे की ती नेमबाजी सोडून शिक्षणासाठी परदेशात जाण्याच्या तयारीत होती. मात्र पॅरिस ऑलिंपिकची वेळ जवळ येत चालली होती. त्यामुळे आपण स्वत:ला एक संधी दिली पाहिजे असा विचार तिच्या मनात घुटमळत होता.
 
जसपाल राणा यांना केलेला 'तो' फोन
या परिस्थितीत कवयित्री आणि मानवाधिकार कार्यकर्ती माया एंजलो यांची कविता 'स्टिल आय राईज' आणि गीतेतील कर्म करत जाण्याचा सिद्धांत यातून मनू भाकरला नेमबाजीच्या क्षेत्रात परतण्यासाठी धीर मिळत राहिला.
 
यात चढउतारांमध्ये एक दिवस मनू भाकरने निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाची अपेक्षा तिच्या जवळच्या कोणत्याच व्यक्तीला नव्हती. तिने जसपाल राणा यांना फोन करण्याचा निर्णय घेतला होता.
 
पॅरिस ऑलिंपिकच्या बरोबरच एक वर्षाआधी जसपाल राणा यांना फोन करून मनू भाकरनं मदतीची साद घातली. जसपाल राणा मनूला नकार देऊ शकले नाहीत.
 
मनूच्या जवळच्या लोकांनी तिला फोन न करण्यास सांगितलं होतं. मात्र एका वर्षाच्या आतच मनूनं चार प्रशिक्षकांचा अनुभव घेतला होता. त्यामुळे तिला या गोष्टीची जाणीव झाली होती की जसपाल राणाच तिचं नशीब पालटू शकतात.
तिने पॅरिस ऑलिंपिक आधी म्हटलं देखील होतं की, जसपाल राणाच तिच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेऊ शकतात. पॅरिस ऑलिंपिकमध्ये मनू भाकरनं कांस्य पदक जिंकल्यानंतर अनेक प्रसारमाध्यमांशी बोलताना जसपाल राणा म्हणाले की मनू मध्ये इतिहास घडवण्याची क्षमता आहे अशी त्यांना आशा होती. त्यामुळेच ते मनू भाकला नकार देऊ शकले नव्हते.
 
या यशाचं पूर्ण श्रेय ते मून भाकरला देतात. या एक वर्षाच्या काळात जसपाल राणा आपल्या अकॅडमीतील जवळपास शंभर विद्यार्थ्यांना विसरले. त्यांनी फक्त मून भाकरवरच लक्ष केंद्रित केलं. मनू भाकरनं देखील ऑलिंपिक स्पर्धेच्या तयारीत पूर्णपणे गढून गेली. तिने स्वत:ला झोकून दिलं.
 
याच दरम्यान मनू भाकरला भारत सरकारच्या ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमामुळे तयार झालेल्या इको सिस्टमची, व्यवस्थेची मदत झाली.
 
रविवारी (28 जुलै) याबद्दल माहिती देताना केंद्रीय क्रिडा मंत्री मनसुख मांडविया यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं, "मनू भाकरच्या प्रशिक्षणावर सरकारनं दोन कोटी रुपयांचा खर्च केला. आम्ही तिला प्रशिक्षणासाठी जर्मनी आणि स्वित्झर्लंडला पाठवलं होतं. आर्थिक पाठबळामुळे तिला हव्या त्या प्रशिक्षकाची निवड करणं शक्य झालं."
 
कोणता विक्रम करण्याच्या जवळ आहे मनू भाकर?
वैयक्तिक प्रशिक्षक म्हणून जसपाल राणा मनू भाकरसोबत पॅरिसच्या खेल गावातच आहेत. प्रत्येक इव्हेंटसाठी ते मनूकडून अनेक तास सराव करून घेत आहेत. मनू भाकर ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली महिला नेमबाज ठरली हा या सर्व गोष्टींचाच परिपाक होता आणि तिने एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदकं जिंकण्याचा विक्रम देखील केला.
जसपाल राणा यांनी पहिल्या पदकानंतर आशा व्यक्त केली होती की मनू आणखी पदकं देखील जिंकू शकते.
तसं पाहिलं तर मनू भाकरला या ऑलिंपिकमध्ये तिसरं पदक जिंकण्याची संधी देखील असेल.
नेमबाजीत 25 मीटर एअर पिस्टल हा मनू भाकरचा आवडता प्रकार आहे. या इव्हेंटमध्ये देखील ती पदक जिंकेल अशी आशा व्यक्त करण्यात येते आहे.
अर्थात, ऑलिंपिकच्या इतिहासात एकाच ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक ऑलिंपिक पदकं जिंकण्याचा विक्रम अमेरिकन जलतरणपटू मायकल फेल्प्स याच्या नावावर आहे. त्याने 2008 मध्ये बीजिंग ऑलिंपिकमध्ये ही कमाल करून दाखवत आठ सुवर्ण पदकं जिंकली होती.
त्यावेळेस त्याचा फॉर्मच असा काही होता की तो ज्या प्रकारात पोहण्यास उतरला त्या प्रत्येकात त्याला सुवर्ण पदक मिळालं होतं. 23 सुवर्ण पदकांसह एकूण 28 ऑलिंपिक पदकं जिंकण्याचा त्याचा विक्रम मोडणं खूपच अवघड गोष्ट आहे.
तर महिला वर्गात जर्मन जलतरणपटू क्रिस्टिन ओटो नं 1988 च्या सेऊल ऑलिंपिकमध्ये एकापाठोपाठ एक सहा सुवर्ण पदकं जिंकण्याची कमाल करून दाखवली होती.
मनू भाकरची कामगिरी या सर्वांच्या तुलनेत भलेही छोटी वाटत असली तरी भारतातील महिला खेळाडूंची स्थिती पाहता तिच्या कामगिरीचं महत्त्व लक्षात येतं.
Published By- Priya Dixit