गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (16:02 IST)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे पिंपरी चिंचवड कनेक्शन; पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिल्या शुभेच्छा

डेमोक्रेटिक पार्टीकडून अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनलेले जो बायडेन यांचे पिंपरी चिंचवड कनेक्शन चर्चेत आले आहे. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत जो बायडेन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
 
अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन हे निवडून आलेले आहेत. जो बायडेन यांनी अमेरिकेतील डेमोक्रेटिक पार्टी या पक्षाकडून निवडणूक लढवली. बायडेन यांनी रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार तसेच विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा पराभव केला आहे. बायडेन यांनी यापुर्वी अमेरिकेचे पुर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह 2009 ते 2017 या कालावधीत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून धूरा सांभाळली आहे.
 
जो बायडेन यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नुकताच जो बायडेन यांच्यासोबत हस्तांदोलन करतानाचा एक फोटो सोशल मिडियावरून शेअर केला आहे. यामध्ये कृष्ण प्रकाश यांनी बायडेन यांना 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
 
याबाबत कृष्ण प्रकाश म्हणाले, “जो बायडेन अमेरिकचे उपराष्ट्राध्यक्ष असताना सन 2013 मध्ये मुंबईमध्ये आले होते. त्यावेळी मी साउथ मुंबई विभागात अप्पर आयुक्त म्हणून कार्यरत होतो. बायडेन यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर होती. बायडेन यांच्या दौऱ्यात मुंबई पोलिसांनी उत्तम सुरक्षा पुरवली. त्यानंतर बायडेन यांनी मला बोलावून सर्व पोलिसांचे आभार मानले. तसेच हस्तांदोलन करत कौतुकाची थाप दिली.”