शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (21:32 IST)

पूजा चव्हाण प्रकरणी पुण्यातील वकिलांच्या जस्टीस लीग सोसायटीमार्फत लष्कर न्यायालयात याचिका दाखल

७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणात आत्तापर्यंत अनेक आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. नुकताच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेऊन पुणे पोलीस योग्य दिशेने तपास करत नसल्याचा आरोप केला आहे. घटनेच्या जवळपास ३ आठवड्यांनंतर देखील पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल न केल्यामुळे त्याविरोधात आता पुण्यात थेट न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. पुण्यातील वकिलांच्या जस्टीस लीग सोसायटीमार्फत भक्ती राजेंद्र पांढरे यांनी अ‍ॅड. विजय ठोंबरे यांच्यामार्फत लष्कर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी प्रमुख मागणी याचिकेत करण्यात आली आहे. युक्तिवादानंतर याचिकेवर निर्देश देण्यासाठी ५ मार्च तारीख न्यायालयाकडून देण्यात आली आहे.
 
पूजा चव्हाण प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसताना विरोधकांनी या मुद्द्याचं भांडवल करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस योग्य पद्धतीने तपास करत नसल्याचा देखील दावा केला जात आहे. ‘प्रसारमाध्यमांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये या प्रकरणावरून मोठी चर्चा सुरू आहे. पूजा चव्हाण हिचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला. पूजाच्या अनेक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल होत असून त्यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची नावे समोर येत आहेत. तरीदेखील त्याचा सखोल तपास होत नसून आरोपी कधीही मृत्यूबाबतचे पुरावे नष्ट करू शकतात’, असं देखील याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांना तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.