गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (20:57 IST)

पुणे :‘नरेंद्र मोदींचं अंत:करणापासून अभिनंदन’ – शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आलं. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार यांची उपस्थिती होती.  दरम्यान लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदी यांची निवड झाली, यासाठी मी त्यांचं अंत:करणापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
 
यावेळी शरद पवार म्हणाले की, “टिळक पुरस्काराला आगळं वेगळं महत्त्व आहे. आज आपण आणि टिळक स्मारकाने पुरस्कारासाठी मोदीजींची निवड केली. या पुरस्कारांमध्ये इंदिरा गांधी, खान अब्दुल गफार खान, बाळासाहेब देवरस, शंकर दयाळ शर्मा, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंह होते अशी अनेक मान्यवरांची नावं या ठिकाणी घेतली जातील. या मान्यवरांच्या पंक्तीत नरेंद्र मोदींचा समावेश झाला याचा सर्वांना आनंद झालं. म्हणून आमच्या सगळ्यांची वतीने त्यांची निवड झाली, त्यांना हा पुरस्कार देण्यात येतोय, त्यांचं अंत:करणापासून अभिनंदन करतो.
 
दरम्यान “टिळकांनी 25 व्या वर्षी मराठी केसरी वृत्तपत्र आणि इंग्रजीत मराठा साप्ताहिकाची सुरुवात केली. केसरी आणि मराठाद्वारे टिळकांनी या देशातील परकीय लोकांवर प्रचंड प्रहार केले आणि लोकजागृती करण्याचं काम केलं.
 
पत्रकारितेवर दबाव असता कामा नाही, अशी त्यांची भूमिका होती आणि ती त्यांनी पाळली. 1885 साली भारतीय काँग्रेसचा जन्म पुण्यात झाला. त्या काळात दोन गटाचे नेते संघटनेत होते ज्यांना मवाळ आणि जहाल म्हणून ओळखले जायचे. जहालांचं नेतृत्त्व लोकमान्यांनी केलं होतं. स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार तो घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही भूमिका जनमानसात मांडली.
 
स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण ही त्रिसूत्री मांडली आणि त्या माध्यमातून संपूर्ण स्वराज्याचं आंदोलन त्यांच्या काळात मांडलं. गणेशोत्सव, शिवजयंती असेल यातून लोकमान्याचं योगदान मोठं होतं. त्या कालखंडात दोन युग होती, एक टिळक युग आणि एक महात्मा गांधींचं युग. दोघांचं योगदान आम्ही विसरु शकत नाही.  या देशाच्या नव्या पिढीला कर्तृत्ववान नेत्याचा आदर्श हा अखंडपणे प्रेरणा देईल याची मला खात्री आहे, असं शरद पवार पुढे म्हणाले.

Edited By - Ratnadeep Ranshoor