शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 25 मे 2021 (22:03 IST)

रिकामटेकड्या चौघांनी 28 ठिकाणी केली चोरी ; ट्रॅक्टर, चारचाकी आणि गायी चोरल्या दहा ट्रॅक्टर सह 77 लाखांचा मुद्देमाल जप्त

रिकामटेकड्या चौघांनी मिळून तब्बल 28 ठिकाणी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या चौघांनी ट्रॅक्टर, चारचाकी, गायी, ऑक्सिजन सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर, गॅस कटर, नट बोल्ट खोलावयाचे पाने अशा साहित्याची चोरी केली. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या टोळीचा पर्दाफाश करत त्यांच्याकडून दहा ट्रॅक्टर सह 77 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
गुन्हे अन्वेषण शाखेने आरोपी सतीश अशोक राक्षे (रा. बेलवंडीफाटा, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर, सध्या रा. शिरूर) याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. तसेच त्याचे साथिदार ज्ञानदेव उर्फ माऊली विनायक नाचबोणे (रा. शिरूर, मुळगाव,औसा, जि. लातूर), प्रविण कैलास कोरडे (रा. बोरी, ता. जुन्नर, जि. पुणे), सुनिल उर्फ भाऊ बिभीषण देवकाते (रा. इरले, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांना अटक केली आहे.
 
आरोपींनी 28 ठिकाणी चो-या केल्याची कबुली दिली आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकुण 76 लाख 88 हजार किंमतीचे 10 ट्रॅक्टर, 2 पिकअप, 1 बोलेरो जिप, 1 स्कॉर्पीओ, 6 मोटार सायकल, ऑक्सिजन सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर, गॅस कटर, 5 गायी, नट बोल्ट खोलावयाचे पाने असा मोठ्ठा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर, पारनेर,जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरीचे बरेच गुन्हे घडत होते. त्याअनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ट्रॅक्टर चोरीचे गुन्ह्यांचा तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
 
दरम्यान, शिरुर शहरात राहणारे चार इसम एकत्र फिरत असून कोणताही कामधंदा न करता वेगवेगळया ट्रॅक्टर, पिकअप अशा गाडया आणतात, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकास मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला.