मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑगस्ट 2019 (10:13 IST)

कोल्हापूर विभागात शेतीचे २८०० कोटींचे नुकसान

2800 crore loss of agriculture
महापुराने कोल्हापूर विभागातील तीन जिल्ह्य़ांमध्ये तब्बल २ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्रातील २ हजार ८०० कोटींचे नुकसान झाले असल्याची माहिती कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.
 
तीन जिल्ह्य़ांमध्ये २ लाख ९ हजार ३३२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून सुमारे २ हजार ८०० कोटींचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने शेती नुकसानीसाठी २ हजार ८०० कोटींची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. बागायती पिकासाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये, जमीन खरवडून गेली असेल तर हेक्टरी ३८ हजार रुपये, गाळ साचला असेल तर हेक्टरी १२ हजार २०० रुपये, फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार २०० रुपये अशी भरपाई देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. शेतीसाठी लागणाऱ्या साहित्यासाठी स्वतंत्रपणे भरपाई देण्याचा विचार होऊ शकतो असेही ते म्हणाले. दरम्यान,ऊस उत्पादकांना एकरी ३० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती आ. पृथ्वीराज देशमुख यांनी या वेळी पत्रकारांना दिली. शेतकरी वर्गाला पुन्हा लागवडीसाठी येणारा खर्च भागावा अशी अपेक्षा यामागे असल्याचेही ते म्हणाले.
 
बोंडे म्हणाले, की सांगलीसह कोल्हापूर आणि सातारा जिल्हयातील पूरग्रस्त भागात शेती पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये ऊस, सोयाबीन, भात, आले, मका, द्राक्ष, हळद, भुईमूग आदी पिकांचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी शिरलेल्या क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या समस्येबाबत शासन गंभीर आणि संवेदनशील आहे.
 
पूरग्रस्त भागातील शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून हे काम उद्यापर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनाम्यावर संबंधित खातेदार शेतकऱ्याची स्वाक्षरी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. पिकाबरोबरच अन्य साहित्याचेही नुकसान झाले असून यामध्ये कृषीपंप, ठिबक संच, जमीन खरवडून जाणे, गाळ साचणे अशा पद्धतीचे नुकसान झाले आहे. सरकार या सर्वच बाबींना स्वतंत्रपणे भरपाई देण्याचा प्रयत्न करीत आहे. रब्बी पिकांसाठी मोफत बियाणे देण्यात येईल असेही ते म्हणाले.