शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 मे 2021 (19:41 IST)

महाराष्ट्र दिनी शिवभोजन थाळीने ओलांडला ४ कोटींचा टप्पा - छगन भुजबळ

राज्यातील ४ कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद. राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन योजना सुरू करण्यात आली असून राज्यात २६ जानेवारी २०२० ते १ मे २०२१ या कालावधीत तब्बल ४ कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
 
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील गोरगरीब नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने शिवभोजन ही महत्त्वाकांक्षी योजना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली. राज्यात २६ जानेवारी २०२० ला या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार केवळ १० रुपयांत राज्यातील गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. पुढे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ ५ रुपयांमध्ये जेवण देण्याचा निर्णय मार्च २०२० मध्ये  घेण्यात आला होता. हा सवलतीचा दर मार्च २०२१ पर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र, अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याने आणि पुन्हा राज्यात कडक निर्बंध लागू केल्यामुळे ही थाळी आता आपण मोफत देत असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. 
 
राज्यशासनाने यापूर्वीच लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत सुरु असलेल्या शिवभोजन केंद्रांच्या प्रतिदिन इष्टांकमध्ये दिडपट वाढ केली आहे. यात जे शिवभोजन केंद्र दिवसाला १०० थाळ्या वितरीत करत होते आता ते केंद्र १५० थाळ्या वितरीत करत असल्याचेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
 
राज्यातील कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. तसेच शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११ ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन अनुदान देत आहे. तसेच राज्यात सुरू असलेल्या शिवभोजन थाळीच्या उद्दिष्टामध्ये वाढ करून अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे, असा मानस देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
 
शासनाने शिवभोजन योजना सुरु केल्यानंतर गेल्या जानेवारी महिन्यात ७९ हजार ९१८, फेब्रुवारी महिन्यात ४ लाख ६७ हजार ८६९, मार्च महिन्यात ५ लाख ७८ हजार ३१ नागरिकांनी आस्वाद घेतला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रसरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊनमधील एप्रिल, मे आणि जून या महिन्यात अनुक्रमे २४ लाख ९९ हजार २५७, ३३ लाख ८४ हजार ४०, ३० लाख ९६ हजार २३२ इतक्या लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतल्याचे सांगितले. 
 
लॉकडाऊननंतरच्या काळात जुलै महिन्यात ३० लाख ३ हजार ४७४, ऑगस्ट महिन्यात ३० लाख ६० हजार ३१९, सप्टेंबर महिन्यात ३० लाख ५९ हजार १७६, ऑक्टोबर ३१ लाख ४५ हजार ६३, नोव्हेंबर २८ लाख ९६ हजार १३०, डिसेंबर मध्ये २८ लाख ६५ हजार ९४३,  २० जानेवारी २०२१ पर्यंत १९ लाख २६ हजार ५४, फेब्रुवारी २०२१ मध्ये २६ लक्ष ५६ हजार ९९१, मार्च २०२१ मध्ये २९ लक्ष ९२८, २१ एप्रिलपर्यंत ३१ लक्ष ८९ हजार तर ३० एप्रिल रोजी १ लक्ष ३८ हजार ७३७ अशा आतापर्यंत एकूण ३ कोटी ९९ लक्ष ९८ हजार ४१९ गरजू नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असून शिवभोजन थाळी वाटपाचा विक्रम झाला असून चार कोटींचा टप्पा पार झाल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
 
राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी असलेल्या या शिवभोजन थाळी योजनेचा असाच वाढता प्रतिसाद राज्य शासनास प्रेरणादायी आहे, तसेच राज्यातील गरीब, मजूर आणि कामगार वर्गाला या योजनेचा फायदा होत असल्यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले आहे.