सोमवार, 3 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 एप्रिल 2023 (08:28 IST)

महाराष्ट्रातील ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मान

5 Gram Panchayats of Maharashtra honored with National Panchayat Award
सर्वसमावेशक विकास करणाऱ्या राज्यातील ५ ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी,  कुंडल आणि पुणे जिल्ह्यातील टिकेकरवाडी या ग्रामपंचायतींना प्रथम क्रमांकाचा  पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला द्वितीय क्रमांकाच्या  आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आलाबाद या ग्रामपंचायतीला तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराने केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
 
येथील विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाच्यावतीने 17 ते 21 एप्रिलपर्यंत ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आज राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, विभागाचे सचिव सुनील कुमार व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी काही प्रमुख पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले तर, काही पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री सिंह यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
 
संयुक्त राष्ट्राने ठरविलेल्या विविध ९ श्रेणीतील सतत विकासाच्या मानकांनुसार द्रारिद्र्यमुक्त आणि सुधारित उपजिवीका श्रेणीत सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील खंडोबाचीवाडी आणि स्वच्छ आणि हरित पंचायत म्हणून कुंडल या ग्रामपंचायतींना राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह दोन्ही ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात प्रत्येकी एक कोटी रूपयांची रक्कम थेट जमा करण्यात आली. खंडोबाचीवाडीचे  सरपंच धंनजय गायकवाड, उपसरपंच उत्तम जाधव, ग्रामसेवक स्वप्नगंधा बाबर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या छोट्याशा गावाने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी २८ बचत गटांची निर्मित केली. या माध्यमातून गावातील महिलांना २८ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. या रक्कमेतून महिलांनी कापड दुकान, शिलाई व्यवसाय, किराणा व्यवसाय, मिरची कांडप, ब्युटी पार्लर, कुक्कुटपालन, पशुपालन व दुग्धव्यवसाय, शेळीपालन असे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १४ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत गावातील ३४९ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेंतर्गत गावातील २२ दिव्यांग व महिलांना संजय गांधी निराधार निवृत्तीवेतन योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ दिला जात आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अन्नसुरक्षा योजनेचा ३६७ लाभार्थींना लाभ दिला जात आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत ४०३ लाभार्थींचे खाती उघडण्यात आली  असून  विविध शासकीय योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवून दिल्याबद्दल ग्रामपंचायत खंडोबाचीवाडी देशात अव्वल ठरली आहे.

स्वच्छ आणि हरित पंचायत या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कुंडल ग्राम पंचायतीला गौरविण्यात आले. पुरस्कार सरपंच दगडू खाडे, गट विकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, ग्रामसेवक महादेव यल्लाटे यांनी स्वीकारला. गावामध्ये ५ लाख लिटर प्रतिदिन क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (वेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्लॅन्ट) आहे. ३५ सौर पथदिवे (सोलर स्ट्रिटलाईट) आहेत व सर्व रस्त्यांवर आणि संपूर्ण गावातील घरांमध्ये एलईडी बल्ब आहेत. गाव संपूर्णपणे हागणदारीमुक्त आहे. पर्यावरणपूरक घनकचरा व सांडपाणी प्रकल्प गावामध्ये उभारण्यात आला आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळ्या २०० कचरापेटीद्वारे गोळा केला जातो. गावात १५०० एकर जैविक पद्धतीने शेती करण्यात येते. त्यांच्या या कार्याची दखल केंद्रीय स्तरावर घेण्यात आली.
 
Edited By - Ratnadeep ranshoor