शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (13:07 IST)

९० वर्षांची म्हातारीच राहिली जिवंत, ट्रॅक्टरच्या स्पेंडलने डोक्यावर वार करून चौघांना ठार केले

गोंदिया : तिरोडा तालुक्यात येणाऱ्या चुरडी येथे एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेवचंद डोंगरू बिसेन (५१), पत्नी मालता रेवचंद्र बिसेन (४५), मुलगी पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०) व मुलगा तेजस रेवचंद बिसेन (१७), अशी एकाच कुटुंबातील मृत चौघांची नावे आहेत. 
 
मंगळवारी पहाटे बिसेन यांच्या घरात अज्ञात मारेकऱ्यांनी प्रवेश केला आणि झोपेत असलेल्या सदस्यांवर ट्रॅक्टरच्या स्पेंडलने डोक्यावर वार करून ठार केले. आरोपींनी हा खून नसून आत्महत्या वाटावी म्हणून रेवचंदचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत नियोजनबद्ध पद्धतीने लटकवला होता. मारण्यासाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टरचा स्पेंडल घटनास्थळपासून १५ फूट अंतरावर फेकलेला आढळला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
 
रेवचंद डोंगरू बिसेन यांच्याकडे ३ मेटॅडोअर व एक ट्रॅक्टर असून ते रेशनचे धान्य ट्रान्स्पोर्ट करण्याचे काम करीत होते. रेवचंद बिसेन यांच्या आई खेमनबाई डोंगरू बिसेन या ९० वर्षांच्या असून पक्षाघाताने ग्रस्त आहेत. त्या समोरच्या खोलीत आपल्या खाटेवर झोपल्या होत्या मात्र त्यांना या घटनेचा सुगावा नसावा. 
 
रेवचंद बिसेन यांच्याकडे वाहन चालक म्हणून काम करीत असलेला प्रताप रहांगडाले मंगळवारी सकाळी १० वाजता वाहनाची चाबी घेण्यासाठी आला असताना त्याला घरात चार मृतदेह दिसून आले. यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.