1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जानेवारी 2020 (10:43 IST)

शिवभोजनासाठी आधारकार्डची सक्ती नाही- छगन भुजबळ

Aadhaar card is not compulsory for Shiv Meal - Chhagan Bhujbal
येत्या 26 जानेवारी रोजी सुरु होणारे ‘शिवभोजन’ हे गरीब व गरजू व्यक्तीसाठी आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन शिवभोजन योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
 
भुजबळ म्हणाले, या योजनेंतर्गत सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी व महानगरपालिका क्षेत्रात किमान 1 भोजनालय सुरु करण्यात येणार आहे. हे भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असेल. ही भोजनालये दुपारी 12.00 ते 2.00 या कालावधीत कार्यरत राहतील. या भोजनालयात दुपारी 12.00 ते 2.00 या कालावधीत या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित भोजनालय चालकाची आहे.
 
यासाठी भोजनालय चालविण्यासाठी या मालकाकडे स्वत:ची पर्याप्त जागा असावी. भोजनालयात एका वेळी किमान 25 व्यक्तींची जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असेल. एका भोजनालयात किमान 75 आणि कमाल 150 थाळी भोजन उपलब्ध होणार आहे. या भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाण्यास मनाई आहे. शासकीय कर्मचा-यांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येईल तेथील आस्थापनेवरील कर्मचा-यांना या भोजनालयात सवलतीच्या दराने जेवणास सक्त मनाई असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.