1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2022 (08:09 IST)

अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 'दारू पिता का?' असा प्रश्न विचारला

State Agriculture Minister Abdul Sattar
शिंदे यांच्या गटातील नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार नेहमी चर्चेत असतात. सध्या सत्तार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बीडच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी अब्दुल सत्तार यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विचारलेल्या प्रश्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 'दारू पिता का?' असा प्रश्न विचारला.

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला. सध्या सरकारकडून नुकसानग्रस्त भागाचे पाहणी दौरे सुरु झाले आहेत. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी बीडच्या दौऱ्यावर आले. पण, यावेळी त्यांनी चक्क दारुच्या गप्पा सुरू केल्या. त्यांचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे, ज्यात ते बीडच्या जिल्हााधिकाऱ्यांना दारू पिता का, असा प्रश्न विचारताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे, कृषीमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनीही उत्तर दिले. कधी कधी थोडी घेतो, असे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना प्रश्न विचारला की, अतिवृष्टी पाहणी दौरा की मद्यसृष्टी पाहणी दौरा? यावेळी त्यांनी एक शेर देखील ट्वीट केला आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor