गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 31 जानेवारी 2022 (21:00 IST)

निलंबित १२ आमदारांना विधानभवनात प्रवेश द्या; आशिष शेलारांची पत्राद्वारे मागणी

Admit 12 suspended MLAs to Vidhan Bhavan; Demand by letter from Ashish Shelar
महाराष्ट्र विधानसभेने भाजपच्या १२ आमदारांचे केलेले एक वर्षांचे निलंबन हे सर्वोच्च न्यायालयाने अवैध, घटनाबाह्य व अतार्किक ठरवून रद्द केले असल्याचे विधानभवन सचिवांना पत्र लिहून भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी अवगत केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे सदर आमदारांना विधानभवनात प्रवेश खुला झाल्याकडे ही सचिवांचे त्यांनी लक्ष वेधले आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या १२ आमदारांना १ वर्षांसाठी निलंबित केल्याच्या विरोधात १२ आमदारांतर्फे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निकाल २८ जानेवारीला दिला असून सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हे निलंबन अवैध ठरवून रद्द केले आहे.
 
आज याबाबत १२ आमदारांच्या वतीने भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभा सचिवांना पत्र लिहून या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सविस्तर कायदेशीर माहिती सचिवांना अवगत केली असून सोबत निवाड्यांची प्रत ही जोडली आहे. न्यायालयाने निलंबन रद्द केल्यामुळे यापुढे विधिमंडळाच्या मुंबई आणि नागपूर येथील विधानभवन परिसरात प्रवेशाचा आमचा मार्ग मोकळा केला आहे, याकडे विधानसभा सचिवालयाचे लक्ष वेधले आहे.