शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 डिसेंबर 2022 (20:54 IST)

निलंबन केल्यानंतर जयंत पाटील संतापले; ट्वीट करत म्हणाले….

jayant patil
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आली. हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात येणार आहे. यानंतर जयंत पाटील यांनी ट्वीट केले असून सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
 
जयंत पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे की, “या निर्लज्ज सरकारविरोधात लढत राहणार. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय,” अससे ट्वीट जयंत पाटील यांनी केले आहे.
 
नेमके काय आहे प्रकरण
विधानसभेमध्ये दिशा सालियान मृत्यू प्रकरणावर चर्चा झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून अनेक दावे करण्यात आले होते. यादरम्यान झालेल्या गोंधळामुळे ६ वेळा कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांकडून आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली. ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली होती. त्यावरून विरोधकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली.
 
यानंतर अजित पवारांनी देखील भास्कर जाधव यांना बोलू देण्याची विनंती केली. दरम्यान, भास्कर जाधवांना बोलू दण्याची मागणी फेटाळून लावल्यानंतर जयंत पाटील यांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली होती. भास्कर जाधवांनी देखील तशी मागणी करायला सुरुवात केली. आमची हरकत आहे. १४ सदस्य समोरून बोलले, १४ वेळा कामकाज तहकूब केले. आम्हाला एका सदस्याला बोलू देत नाही. तुम्ही सदस्यांचा जीव घेताल अध्यक्ष महोदय, असे भास्कर जाधव म्हणाले होते.
 
याचवेळी जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून “तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका”, असे म्हटले. त्यावेळी सत्ताधारी बाकांवरून आमदारांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. “जयंत पाटील यांना निलंबित करा”, अशी मागणी आमदारांनी केली. विधानसभा अध्यक्षांनीही “जयंत पाटील, हे आपल्याकडून अपेक्षित नाही”, असे म्हणत नाराजी व्यक्त केली आणि कामकाज तहकूब केले. यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्षांविषयी असे वैधानिक शब्दप्रयोग केल्याचा आरोप जयंत पाटलांवर ठेवण्यात आला. यावर विधानसभा अध्यक्षांनी जयंत पाटलांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याची कारवाई केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor