1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 24 एप्रिल 2021 (08:50 IST)

दुर्मिळ गोष्ट : वय ८८, एचआरसीटी स्कोअर २५ पैकी २५, त्यात मधुमेहाचा आजार, मात्र जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाला हरवले

वय ८८, एचआरसीटी स्कोअर २५ पैकी २५, त्यात मधुमेहाचा आजार, तरीही जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर नाफेडचे माजी अध्यक्ष चांगदेवराव होळकरयांनी कोरोनाला हरवल आहे. ना आयसीयू, ना व्हेंटिलेटर, केवळ दांडगी रोगप्रतिकारशक्‍तीच या ज्येष्ठाच्या जिंकण्याचे कारण ठरली असून ही एक दुर्मिळ गोष्ट झाली आहे.सध्याच्या भयावह स्थितीत हजारो, लाखो बाधितांना आदर्श ठरावा असा कोरोनावर विजय होळकर यांनी मिळविला आहे. 
 
लासलगाव येथील चांगदेवराव भगवंतराव होळकर (८८) यांची गेल्या १५ दिवसांपूर्वी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.घरात काम करणार्‍या कामगाराला कोरोनाची लागण झाली म्हणून त्यांनीही चाचणी केली. त्यात त्यांच्या पत्नीची चाचणी निगेटिव्ह, तर चांगदेवराव यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.त्यानंतर त्यांची एचआरसीटी चाचणी करण्यात आली. त्यात सुरुवातीला त्यांचा स्कोअर ७ इतका आला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्‍ला दिला. मधुमेह आणि वय जास्त असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करणे गरजेचे असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते वोक्हार्ट रुग्णालयात दाखल झाले.
 
उपचार सुरू असताना दहाव्या दिवशी पुन्हा त्यांची एचआरसीटी चाचणी करण्यात आली. त्यात त्यांचा स्कोअर २५ पैकी २५ आला. मात्र, आश्‍चर्याची बाब म्हणजे त्यांना कुठल्याही स्वरूपाचा त्रास नव्हता. सर्दी, खोकला अशी कुठलीही लक्षणे नसल्याने, डॉक्टरही चकीत झाले होते. स्कोअर अधिक असल्याने डॉक्टरांनी त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शने दिली. तसेच त्यांच्यासाठी पुढील दोन दिवस हे अत्यंत जोखमीचे असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले. व्हेंटिलेटरची गरज पडेल याबाबतची कल्पनाही डॉक्टरांनी दिली. मात्र, चांगदेवराव होळकर यांनी पुढील उपचारांना नकार देत घरी जाण्याचा आग्रह धरला. त्यानुसार त्यांना घरी आणून विलगीकरणात ठेवण्यात आले. बघता-बघता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. आता त्यांची प्रकृती उत्तम असून, नुकताच त्यांची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली आहे.