शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (10:01 IST)

राज्यात सर्व ST आगार बंद

कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या एसटी महामंडळाचा गाडा पूर्वपदावर येत असतानाच  ऐन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीचे दररोज १३ कोटींचे नुकसान होत आहे. या संपामुळे एसटीचा संचित तोटा हा तब्बल साडेबारा हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे. तर कर्मचारी संपामुळे बुधवारी एसटीचे २५० पैकी २५० आगार बंद होते. राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते.

देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली. कोरोनापूर्वी एसटी महामंडळाचा ४,५४९ कोटी रुपयांचा तोटा होता. मात्र एसटीला कोरोनाकाळात तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या हक्काच्या ३,८०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. त्यामुळे एसटीचा तोटा वाढला. आज कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात एसटीला जवळ जवळ ७,९५१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यात आता संपामुळे एसटी महामंडळाचा संचित तोट्याचा आकडा हा साडेबारा हजार कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचलेला आहे.

ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप आता चांगलाच चिघळला असून राज्यात बुधवारी दिवसभरात २५० आगारांपैकी २५० आगार बंद पडले आहेत. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेल्याने सरासरी १०० कोटी रुपयांचा फटका एसटीला बसला. तर संपामुळे दररोज १३ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे