अश्विनीचा झाला अंश, लिंग परिवर्तनाची शेवटची शस्त्रक्रियाही यशस्वी
कडेगाव येथील अश्विनी खलिपे यांच्यावर दिल्ली येथील सर गंगाराम रुग्णालयात टप्प्याटप्प्याने झालेल्या तीन लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्या आहेत. डॉ. भीमसिंग नंदा यांनी तिन्ही शस्त्रक्रिया यशस्वी केल्या, यामुळे अश्विनीची आता अंश खलिपे अशी ओळख झाली आहे. दोन वर्षांपूर्वी अश्विनी खलिपे या २८ वर्षीय तरुणीने लिंग परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर गॅझेट करून अंश खलिपे हे नाव धारण केले. पहिल्या टप्प्यातील शस्त्रक्रिया १६ मार्च रोजी २०२२ रोजी झाली. नंतर चार महिन्यांनी दुसऱ्या टप्प्यातील शस्त्रक्रियाही यशस्वी झाली. त्यानंतर आता नुकतीच तिसरी शस्त्रक्रियाही यशस्वी झाल्याने अश्विनी आता अंश म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
अश्विनीच्या शारीरिक जडणघडणीतून लहानपणापासून पुरुषाप्रमाणे बदल दिसून येत होते. करारीपणा, निडरपणा, पोशाख या सर्व बाबतीत पुरुषाप्रमाणे वर्तन होते. त्यामुळे तिने लिंग परिवर्तन करुन मुलगा होण्याचा निर्णय घेतला. तोंडोलीसारख्या ग्रामिण भागातील मुलीने घेतलेला हा निर्णय अत्यंत धाडसी होता. त्याला कुटुंबियांनी पाठिंबा दिला. समाजाडा परिवर्तनाची नवी दिशा दिली.
अंश खलिपे याने सांगलीत कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सध्या भारती विद्यापीठाच्या पुणे येथील कायदा महाविद्यालयात कायद्याचे पुढील शिक्षण घेत आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor