शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (17:06 IST)

नाशिकमध्ये अफगाणी कथित अध्यात्मिक 'बाबा'ची सहकाऱ्यांकडूनच हत्या

murder
नाशिकमधील येवला MIDC परिसरात स्वतःला मुस्लीम अध्यात्मिक बाबा म्हणून घेणाऱ्या एका अफगाणी नागरिकाची हत्या मंगळवारी करण्यात आली होती. ही हत्या पैशांच्या कारणावरून त्याच्या सहकाऱ्यांनीच केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
मृत्यूमुखी पडलेल्या अध्यात्मिक बाबाचं नाव सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती असं होतं. चिश्ती हे मूळचे अफगाणिस्तान इथले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
येवला येथील MIDC मध्ये गोळ्या झाडलेला एक मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना मंगळवारी संध्याकाळी मिळाली होती. घटनास्थळी पोलिसांना एका भूखंडावर अगरबत्ती लावून नारळ फोडलेले होते. तसंच कुंकवाची एक डबीही त्याठिकाणी होती. त्यामुळे हे प्रकरण गुंतागुंतीचं असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
 
पोलिसांनी वेळ न दवडता तत्काळ तपास सुरू केला. मृत व्यक्तीची ओळख जरीब चिश्ती यांच्या नावाने पटल्यानंतर काही तासांतच पोलिसांना या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात यश आलं.
 
पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ही हत्या त्यांच्या चालकानेच केली आहे. संपत्ती आणि पैशाच्या कारणावरून जरीब अहमद चिश्तींची हत्या करण्यात आल्याचे समोर आलं आहे."
 
"सध्यातरी, हत्येमागे इतर कोणतंही कारण दिसून येत नाही. पण पोलिसांनी तपास थांबवलेला नसून आणखी काही शक्यतांचा विचार करून पुढील तपास करण्यात येत आहे," असं पोलिसांनी सांगितलं.
 
याविषयी माहिती देताना पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले, "सिन्नर तालुक्यातील वावी गावा येथून जरीब चिश्ती आणि त्याचे सहकारी सहकारी येवल्यातील दोन ठिकाणी पूजेसाठी गेले होते. दुपारी 4 नंतर त्यांनी जेवण केलं, त्यानंतर चिश्ती यांच्या ड्रायव्हरने सांगितलं की, जवळच्या औद्योगिक परिसरातही एका प्लॉटची पूजा करायची आहे. संध्याकाळी 7 च्या आसपास त्यांनी चिंचोडी एमआयडीसी येथे दुसऱ्या एका प्लॉटवर कुंकू व अगरबत्ती ओवाळत नारळ वाढवून पूजा केली, त्यानंतर चिश्ती गाडीत बसत असताना त्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली. यानंतर चालक आणि त्याचे साथीदार चिश्ती यांना तिथेच टाकून वाहनासह पळून गेले."
 
पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरू आहे. याच आरोपीच्या नावावर जरीब अहमद चिश्ती यांनी महिंद्रा SUV 500 हे चारचाकी वाहन खरेदी केलं होतं. तर मुख्य संशयित असलेला चिश्तीचा वाहनचालक आणि इतर तिघे सहकारी फरार आहेत. या सर्वांचा तपास करण्यात येत आहे.
 
ख्वाजा सय्यद जरीब अहमद चिश्ती नेमका कोण आहे?
ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती हा ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांच्या वंशातील आहे. त्याला मुस्लीम धर्माचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पाठवण्यात आलं आहे, असा दावा ते करायचे. लोकांचा त्यांच्यावर विश्वासही होता. यासंदर्भात इतर अनेकांसोबत बनवलेले व्हीडिओ चिश्ती याने यूट्यूब चॅनलवर टाकले आहेत.
 
ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती यांचं सोशल मीडियावरही अकाऊंट आहे. युट्यूबवर चिश्तीचं एक चॅनलही आहे. या चॅनलवर त्याचे सुमारे 2 लाख 23 हजार सबस्क्रायबर्स होते.
 
चिश्ती यांनी युट्यूब चॅनलवर टाकलेल्या व्हीडिओंना मोठ्या प्रमाणात दर्शक (व्ह्यू) होते. तसंच इन्स्टाग्रॅमवर त्यांच्या रील्सलाही लोकांना चांगला प्रतिसाद मिळायचा.
 
चिश्ती सर्व धर्मांशी संबंधित लोकांच्या पूजा-अर्चेचं काम करायचे. विशेषतं लोक लहान मुलांना त्यांच्याकडे आशीर्वादासाठी घेऊन जात असत. त्यांच्या व्याख्यानांमध्ये देव आणि धर्म काय शिकवतात यावर नेहमीच भर असायचा.
 
ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती अफगाण नागरिक केंद्राने दिलेल्या निर्वासित नागरिकांच्या व्हिसाअंतर्गत 4 वर्षांपासून भारतात राहत होते. सुरुवातीला काही काळ ते दिल्लीत होते. नंतर काही दिवस कर्नाटकातही राहिले.
 
गेल्या दीड वर्षांपासून नाशिक-शिर्डी रस्त्यालगतच्या वावी गाव येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिरगाव येथे भाड्याने घेतलेल्या घरात ते रहात होते. जरीब चिश्ती यांच्यासोबत एक अफगाणी महिलाही राहत होती. दोघे विवाहित आहेत किंवा नाही, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यांच्या विवाहाची कागदपत्रे अद्याप समोर आली नाहीत.
 
जरीब अहमद चिश्ती हे निर्वासित असल्याने त्यांचं भारतात बँक खातं नव्हतं. ते इथे मालमत्ता खरेदी करू शकत नसत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत यूट्यूब चॅनल आणि लोकांनी दिलेली देणगी होती. चिश्ती यांचे ड्रायव्हर आणि इतर लोकांच्या खात्यात ती रक्कम जमा व्हायची. यूट्यूब चॅनलवर देणगीसाठी ते आवाहन करत असत. त्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचे नंबर देण्यात आले होते.
 
पोलिसांच्या प्राथमिक तपासात चिश्ती यांची मालमत्ता 3 कोटींपर्यंत असू शकते. त्यांनी युट्यूबवर दिलेल्या नंबरशी संबंधित खात्यांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसंच चिश्ती यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या नावाने जमिनी घेतल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे.
 
चिश्तीने दिलेल्या खात्यांवर परदेशातूनही देणगी आली आहे का, याचा तपास पोलीस स्वतंत्रपणे करत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एकही संशयास्पद देणगी अथवा देणगीदार दिसून आलेले नाही. याबाबत पोलीस आता अफगाण उच्चायुक्त कार्यालयाशी बोलून अधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
या घटनेनंतर पोलिसांचा गुप्तचर विभागही सतर्क झाला आहे, अशी माहिती गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
 
या नागरिकाच्या बाबतीत केंद्राकडूनच आम्हाला माहिती होती आणि त्यांनी व त्यांच्यासोबत राहणाऱ्या महिलेने वावी पोलीस ठाण्यात सर्व कागदपत्रे व माहिती दिली होती. सर्वांची नजर त्यांच्यावर होती.
 
पण धार्मिक उपदेश आणि उपासनेसाठी लोकांकडून पैसे गोळा करण्या व्यतिरिक्त इतर कोणतीही संशयास्पद गोष्ट आम्हाला दिसली नाही. आमच्या माहितीनुसार फरार चारपैकी दोन परराज्यातील आहेत. आमचा सखोल तपास चालू आहे.