शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 मे 2021 (11:11 IST)

अचानकपणे वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्या

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात कोविड-19 बाधित रुग्ण शासकीय तसेच खाजगी रुग्णालये आणि कोविड केअर सेंटर येथे उपचार घेत आहेत. त्यामुळे या काळात अचानकपणे वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता महावितरण विभागाने घ्यावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.
 
मागच्या काही दिवसात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर अमित विलासराव देशमुख यांनी मंत्रालयातून दुरदृष्य प्रणालीद्वारे लातूर जिल्हा प्रशासन, महावितरणचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या समवेत आढावा बैठक घेतली.
 
याप्रसंगी सूचना देताना पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले की, मागच्या काही दिवसात लातूर शहर आणि जिल्ह्यात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याच्या तक्रारी नागरीकांकडून येत आहेत. सध्या कोरोना प्रादुर्भावाच्या कठीण काळातून आपण जात आहोत. कोविड-19 बाधित झालेले अनेक रुग्ण शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. काही रुग्ण संस्थात्मक तथा गृहविलगीकरणात आहेत. या परिस्थितीत वारंवार वीज पुरवठा खंडीत झाल्यास रुग्णालयात उपचार घेणाऱ्या काही गंभीर अवस्थेतील रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महावितरणने अचानक वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
 
अपवादात्मक परिस्थितीत दुरुस्तीच्या कामासाठी काही भागात वीज पुरवठा खंडीत करावयाचा असल्यास त्या परिसरातील रुग्णालयांना यासंबंधीची पूर्वकल्पना द्यावी, त्यांची नाहरकत मिळाल्यावरच किंवा पर्यायी व्यवस्था झाल्यानंतरच तेथील वीज पुरवठा खंडीत करावा, असे निर्देशही पालकमंत्री देशमुख यांनी दिले.
 
शहर आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाळ्यापूर्वीची वीज वाहिन्या व ट्रान्सफार्मर देखभाल दुरुस्तीची कामे करावयाची असल्यास त्यासाठी महावितरणने जिल्हा प्रशासनाला यासंबंधीची पूर्वकल्पना द्यावी, प्रशासनाने यासंबंधी सर्वतोपरी खबरदारी घेऊन या कामासाठी परवानगी द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातील अनेक कोविड बाधित रुग्ण शेत-वस्त्यांवर विलगीकरणात राहात आहेत. त्यामुळे त्याठिकाणी नियमित सिंगल फेज पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करावे, खेडेगावातील आणि शेतीपंपाचे ट्रान्सफॉर्मर वारंवार नादुरुस्त होण्याच्या घटना घडत आहेत. याबाबतही दक्ष राहून ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होणार नाहीत याची काळजी घ्यावी. शिवाय नारुस्त झालेले ट्रान्सफॉर्मर तात्काळ दुरुस्त करुन देण्याची व्यवस्था करावी. डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत वीज कनेक्शन देण्यात यावे, नवीन वस्त्यांमध्ये पोलची उभारणी करावी, वाकलेले पोल बदलून घ्यावे, शहर वस्त्यांमधून गेलेल्या हायटेंशनच्या वीजवाहिन्या इतरत्र हलवाव्या आदी सूचना पालकमंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी दिल्या आहेत.
 
लातूर जिल्ह्यातील 50 पेक्षा अधिक बेड असलेल्या रुग्णालयात पावर बॅकअप आहे किंवा नाही तसेच सदर रुग्णालयाची अग्निशमन यंत्रणा जिल्हाधिकाऱ्यांनी तपासून घ्यावी, अशी सुचनाही पालकमंत्री देशमुख यांनी बैठकीदरम्यान केली.