1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

ब्ल्यू व्हेल गेममुळे मुंबईत पहिला बळी

मोबाईल किंवा व्हिडिओ गेम्सच्या आहारी गेलेला वर्ग मोठा आहे. या गेम्सचे इतके व्यसन तरूणाईला लागले आहे की या गेम्सच्या आहारी जाऊन अनेक शारीरिक आणि मानसिक विकार त्यांना जडले आहेत. पण आता विरंगुळा म्हणून खेळले जाणारे हे खेळ कधी तरूणाईच्या जीवाशी खेळू लागले ते कळलेच नाही.
 
रशियामध्ये दहशत पसरवणार्‍या ब्ल्यू व्हेल या एका ऑनलाइन खेळाचा पहिला बळी भारतात गेला असल्याचे समजते. अंधेरी पूर्वेकडील शेर ए पंजाब वसाहतीत राहणार्‍या मनप्रीत सिंह या चौदा वर्षांच्या विद्यार्थ्यांने रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास आत्महत्या केली.
 
ब्ल्यू व्हेल या ऑनलाइन खेळामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तीवेला आहे. मनप्रीतने आपल्या राहत्या गच्चीच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. मेघवाडी पोलिस ठाण्यात त्याच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आसून पुढील चौकशी व तपास सुरू आहे.
 
ब्ल्यू व्हेल नामक हा गेम आजवरचा सर्वात घातक गेम ठरला आहे. सूत्रांनुसार या गेमने 130 जणांचे बळी घेतले आहेत. हा गेम खेळणारी मुलं डिप्रेशनची शिकार होत असल्याचं समोर आलं आहे.
 
हा गेम सोशल मीडियाच्या माध्यमातून खेळला जातो. गेम सुरू झाल्यानंतर खेळाडूला एक मास्टर मिळतो. हा मास्टर पुढील 50 दिवस खेळाडूला नियंत्रित करतो. मास्टरतर्फे रोज नवीन आव्हानं दिली जातात, जे पूर्ण करणं अपेक्षित असतं. यातील बहुतांश आव्हानं ही खेळाडूला नुकसान होईल अशा प्रकारची असतात.
 
उदा. धारदार शस्त्राने किंवा हातावर व्हेलचं चित्र काढणं, पहाटे ४ वाजता अत्यंत भयप्रद व्हिडिओ बघणे, रात्री न झोपणं अशी आव्हानं या खेळाद्वारे दिली जातात. या खेळातील शेवटचं आव्हान हे आत्महत्या करणं असतं. आत्तापर्यंत हे आव्हान स्वीकारून आत्महत्या केल्याच्या काही घटना उघडकीस आल्या होत्या मात्र मुंबईतील आणि कदाचित देशातील ही पहिलीच घटना असावी.