1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 15 डिसेंबर 2020 (10:45 IST)

राज्यभर पावसाची शक्यता आणि घनदाट धुकं पसरण्याचा अंदाज

गेल्या 3-4 दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण आहे तर अनेक ठीकाणी पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार अजुनही कायम असल्यामुळे राज्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुक्याची शक्यता असून वाहनचालकांसाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. 
 
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजही संपूर्ण ढगाळ वातावरण असणार आहे. थंडगार वारे आणि मधूनच पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. यामुळे हवेतील गारवा आणखी वाढेन. खरंतर, अरबी समुद्राच्या पश्चिम भाग, महाराष्ट्राची किनारपट्टी आणि मध्यप्रदेश या भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहेच. पण यातच या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता कमी होऊन कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश या दिशेने बाष्प पुढे सरकले आहे. इतकंच नाही तर बंगालच्या उपसागरात पुन्हा चक्रिवादळासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दहा ते पंधरा दिवस थंडीत चढउतार राहणार असून किमान तापमान कमीअधिक स्वरूपात राहणार आहे.
 
हवामानातील सततच्या बदलांमुळे आज राज्यभर पावसाची शक्यता आणि घनदाट धुकं पसरण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यामुळे ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ अशा भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांना धोका असणार आहे.