शरद पवारांच्या निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव
बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाचा (Coronavirus)कहर वाढतच चालला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. त्यांच्यावर शासकीय मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू आहेत.
बारामतीत आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळे 25 जणांचा मृत्यू झाला आहे. खासदार शरद पवार यांच्या गोविंद बाग येथील निवास्थानी घरकाम व शेतात काम करणाऱ्या 58 वर्षीय, 27वर्षीय, 39 वर्षीय पुरूषाला आणि एका 40 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी सांगितले.
19 ऑगस्ट रोजी रोजी घेतलेल्या नमुन्यांपैकी प्रतीक्षेत असलेल्या 38 जणांचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यापैकी माळेगाव येथील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह (Coronavirus) आले आहेत. तर उर्वरित 34 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे 19/ 8 /20रोजी घेतलेल्या 135 नमुन्यांपैकी एकूण कालचे चार व आजचे चार असे आठ जणांचा अहवाल rt-pcr पॉझिटिव्ह आलेला आहे.
बारामतीची एकूण रुग्ण संख्या 474 झाली आहे. तसंच काल दिनांक 20 ऑगस्ट रोजी एकूण 138 जणांचा अहवाल rt-pcr तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 74 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 64 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत दरम्यान, काल बारामतीतील खाजगी प्रयोग शाळेमध्ये अँटिजन चाचणीद्वारे घेण्यात आलेल्या शहरातील तीन जणांचे अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आलेले आहेत.