सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (17:20 IST)

दिवाळीनंतर कोरोना वाढू शकतो, असा अंदाज आहे :टोपे

राज्यात 70 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून राज्यात लसीकरण मोहिम आणखी वेगात वाढवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लसीकरणात महाराष्ट्राचं मोठं योगदान असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. लसीकरणासाठी मिशन कवच कुंडलचा फायदा झाला असून मिशन कवच कुंडल आणखी वेगाने राबवणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं
 
नगर नाशिकच्या सीमेवर कोरोनाची काही प्रकरणं वाढली आहेत, मात्र घाबरुन जाण्याची गरज नाही, प्रशासकीय यंत्रणा चांगलं काम करत आहे. मात्र दिवाळीनंतर कोरोना वाढू शकतो, असा अंदाज आहे, असं असलं तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सध्या तरी शक्यता नाही, लसीकरण झालेल्या ठिकाणी कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. पण दुसरी लाट शंभर टक्के संपली असं नाही फक्त फ्लॅट झालीये, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे. 
 
यापुढे वैद्यकीय विभागात पदांना मुदतवाढ नाही, 60 वर्ष अंतिम अंतिम वय असेल असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. फटाकेबंदी योग्य आहे लोकांनी आवर घालावा असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.महाविद्यालये सुरू होणार असल्याने सर्व तरुण तरुणींचे अभिनंदन, त्यांनी लसीकरण कार्यक्रमात सहभाग घ्यावा असं आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.