गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (09:21 IST)

३६ जणांची करोना चाचणी निगेटिव्ह

चीनच्या वुहानमध्ये करोनानंतर एअर इंडियाच्या विमानाने आलेल्या ६४५ भारतीयांना दिल्लीच्या आयटीबीपी आणि मानेसर आर्मी कॅम्पमध्ये विलगीकरण कक्षात १४ दिवस ठेवण्यात आले होते. यातील ३६ जणांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याने राज्यात परतले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

विलगीकरण कालावधी संपल्यानंतर आता या प्रवाशांना आपापल्या मूळगावी जाण्यास हरकत नसल्याचे सांगण्यात आले. या प्रवाशांचा पुढील १४ दिवसांसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४१ हजार २०८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. राज्यात बाधित भागातून २६६ प्रवासी आले आहेत.

राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ७१ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ७० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एनआयव्ही पुणे यांनी दिला. तर, भरती ७१ प्रवाशांपैकी ६९ जणांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. सध्या दोन जण मुंबईत दाखल आहेत. दरम्यान, बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण २६६ प्रवाशांपैकी १४२ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या पाच जण निरीक्षणाखाली असून २ जण मुंबईत तर ३ जण पुण्यात दाखल असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.