1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 मार्च 2023 (10:11 IST)

शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट, विरोधक सरकारला पुन्हा घेरण्याची शक्यता

कापूस आणि कांद्याला दर मिळत नसल्यामुळे संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या दोन दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. गेल्या आठवड्याप्रमाणेच विधिमंडळात हा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे.
 
शिमग्याच्या दिवशीच पाऊस पडल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पिकांचं नुकसान झालं आहे.
 
ठाणे, पालघरसह राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशीम, नाशिक, छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद), पैठण, गंगापूर परिसरातील अनेक तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.
 
वर्धा जिल्ह्यात परवा रात्री झालेल्या अवकाळी पावसाचा संत्रा पिकांवर मोठा फटका बसलाय.
 
पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळ संत्रा गळून पडला आहे. कारंजा या तालुक्यात संत्रा पिकांसह अन्य पिकांचही नुकसान झालं आहे.
 
बुलढाणा जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह प्रचंड पाऊस झाला. यामुळे गहू पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. काढणीला आलेला गहू शेतात अक्षरशः झोपला आहे.
 
पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
 
मुंबई, ठाण्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रावर ढगाळ वातावरण असल्याने बऱ्याच ठिकाणी आणखी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
 
त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत.