1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 मे 2021 (07:33 IST)

रायगड जिल्ह्यात २ हजार २५४ जणांना निवारा शेड मध्ये हलविले

cyclone tauktae
अरबी समुद्रात घोंगावत असलेले चक्रीवादळ सोमवारी पहाटे रायगड किनारपट्टीवरून पुढे सरकरण्याची शक्यता आहे. यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाप्रशासनाने किनारपट्टीवरील भागात कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यास सुरवात केली आहे. रायगड जिल्ह्यात २ हजार २५४ जणांना निवारा शेड मध्ये हलविण्यात आले होते.
 
या चक्रीवादळाचा तडाखा प्रामुख्याने अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण तालुक्यांना बसण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन समुद्र किनाऱ्यावरी ६२ तर खाडी किनाऱ्यावरील १२८ गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. सोमवारी पहाटेपासून रायगड पासून रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील भागात वादळाचा प्रभाव दिसण्यास सुरवात होईल. किनारपट्टीवरील भागात वादळी वारे वाहतील, काही ठिकाणी मुसळधार पाऊसही होईल. समुद्र खवळलेला असेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.