बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 मे 2018 (14:59 IST)

डी.एस. कुलकर्णी यांची मालमत्ता जप्तीच्या आदेशाची अधिसूचना

कारागृहात असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांची मालमत्ता जप्तीच्या आदेशाची अधिसूचना शासनाने जारी केली  असून, आता त्यांची संपत्ती  जप्त केली जाणार आहे. शासनाने प्रसिद्ध केलेल्या या अधिसूचनेत विविध ठिकाणी असलेल्या 124 जागा, विविध कंपनीच्या नावावरील तसेच वैयक्तिक अशी एकूण 276 बँक खाती आणि महागड्या आलिशान गाड्यांसह 46 दुचाकी व चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे काही प्रमाणात ठेवीदार वर्गाला दिलासा मिळणार आहे. डीएसके यांच्या पत्नी हेमंती आणि मुलगा शिरीष तसेच कंपन्यांच्या नावावर जागा, बँक खाती आणि वाहने आहेत. डीएसके यांच्याविरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर, कोल्हापूर आणि मुंबई येथील पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील हितसंबंधाचे) संरक्षण अधिनियम १९९९ नुसार गुन्हे दाखल असून, त्यावर सरकारने कारवाई सुरु केली आहे. अधिसूचनेद्वारे शासनाने डीएसके यांची ही मालमत्ता आता जप्त केली आहे. यापुढे त्या प्रत्येक मालमत्तेचे मूल्य किती असेल, हे निश्चित केले जाईल. त्यानंतर तिचा लिलाव केला जाईल. जो अधिक बोली बोलेले, त्याच्या नावावर ही मालमत्ता होईल. या मालमत्ता तारण ठेवून डीएसके यांनी कर्ज घेतले असेल तर त्या बँका न्यायालयात अर्ज करुन आपला हक्क सांगू शकणार. मराठी उद्योजक असलेल्या डीएसके यांची अशी वाताहत पाहता  अनेकांना  धक्का बसला आहे.