बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

डॉ. प्रकाश आमटे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा १६ वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या प्रांगणातील शिक्षण प्रशिक्षण प्रबोधिनीत पार  पडला  असून यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवीने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले  आहे.
 
वीज, रस्ते, आरोग्यसुविधा नसलेल्या भागात बाबांच्या प्रेरणेने काम सुरू करता आले. या कार्यात पत्नी आणि सहकार्यांचे योगदान मिळाले. त्याचबरोबर निष्पाप आदिवासींसोबत काम करून जीवन समृद्ध झाले, अशा शब्दात डॉ.प्रकाश आमटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
ते म्हणाले, निष्ठेने काम केल्यास समस्यांवर मात करता येते. पदवी मिळाल्याचा आनंद असतोच, मात्र त्यापेक्षाही दु:खी रुग्णांची सेवा केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे हास्य ही मोठी ऊर्जा असते. समाजासाठी काम करताना मिळणारे समाधान कोणी हिरावून नेऊ शकत नाही.
 
ग्रामीण भागासारखा अनुभव शहरात मिळणार नाही. हा अनुभव आयुष्याला कलाटणी देणारा ठरू शकेल. त्यामुळे ग्रामीण भागाच्या सेवेसाठी विद्यार्थ्यांनी किमान एक वर्ष द्यावे. देशासाठी हे कार्य करीत असल्याची भावना त्यामागे असावी आणि हे करताना गरज व लोभातली पुसट रेषा विद्यार्थ्यांनी ओळखावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.