साहित्य संमेलनासाठी नियमावली जाहीर, असे आहेत नियम
नाशिकमध्ये सुरु होणाऱ्या साहित्य संमेलन निर्विघ्न पार पाडण्यासाठी मास्क आणि लसीकरण महत्वाचे ठरणार असून त्यामुळे संमेलनासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलन आयोजकांची बैठक संपन्न झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे बोलत होते. ते म्हणाले कि, साहित्य संमेलनात नो व्हाक्सीन नो एन्ट्री च्या सूचना देण्यात आल्या असून दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासण्यात येणार आहे. तसेच साहित्य संमेलन स्थळी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपस्थित प्रत्येकाने मास्क घालणे अनिवार्य आहे. मास्कशिवाय प्रवेश देण्यात येणार नसून मास्क संमेलन स्थळी फेकू नये, असे आवाहनही त्यांनी सांगितले.
दरम्यान संमेलनस्थळी विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. या ठिकाणी विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या परिसंवादात येणाऱ्या वक्त्यांना देखील दोन डोस अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच दोन कार्यक्रमांच्या मध्ये संपूर्ण परिसर सॅनिटाइझ केला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे एखाद्याला ताप असेल तर तपासणी करूनच संमेलनाला या, ज्यांना त्रास जाणवत असेल त्यांनी येऊ नये असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाच्या उपस्थिती वर पहिल्या दिवसापासून मर्यादा असून आसनव्यवस्थेत क्षमतेनुसार अंतर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पहिली लाट येताना जी काळजी घेतली, तशाच पद्धतीने काळजी घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.