मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 मे 2021 (08:06 IST)

सतत केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय सोडा, कधी तरी आत्मचिंतन करा; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला

आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची राज्य सरकारला सवय लागली आहे. आताही सवय सोडा. कधी तरी आत्मचिंतन करा, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आघाडी सरकारला दिला. कोपरगाव येथे ४० ऑक्सिजन बेडच्या कोविड सेंटरचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. 
 
आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची राज्य सरकारला सवय लागली आहे. त्यांनी कधी तरी आत्मचिंतन केलं पाहिजे. कधी काय करावं याचा विचार सरकारने केला पाहजे, असं सांगतानाच आपत्ती कोणत्याही एका पक्षाची नसते. आपत्तीत सर्वांनी मिळून काम करायचं असतं, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला. चांगलं झालं आपली पाठ थोपटून घेतात. पण त्यात काही उणीव दिसली की लगेच केंद्राकडे बोट दाखवतात. राज्य सरकारचं असं वागणं बरं नाही, असं चिमटा त्यांनी काढला.
 
यावेळी त्यांनी पीकविमा योजनेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकारने सुरुवातीला टेंडर काढलं नाही. उशिरा टेंडर काढलं. त्यामुळे काही जिल्ह्यात टेंडरच झाले नाही. फळबागा संदर्भात यांनी अनेक निकष बदलले. निकष बदलल्याने टेंडर झाले तिथे मदत मिळाली नाही. या संदर्भात गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि टेंडरही वेळेत गेले पाहिजे, असं ते म्हणाले.
 
वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. आंबेडकर यांनी चांगला सल्ला दिला आहे. मात्र मी ते काम कधीच सुरू केलं आहे. नागपूरला थांबून जे करायचं आहे, ते आधीच केलं. ऑक्सिजनचा साठा कमी होता, तो आणला आहे. विविध सेवाही सुरू केल्या आहेत. आम्ही जे काही केलंय, ते कदाचित आंबेडकरांपर्यंत पोहोचलं नसेल. त्यांच्यापर्यंत आम्ही ते पोहोचवू, असं त्यांनी सांगितलं.