रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 14 जानेवारी 2024 (14:46 IST)

तापमानवाढीची समस्या जागतिक समस्या

तापमानवाढीची समस्या जागतिक समस्या बनली आहे. हवामानबदल आता नित्याचे झाले आहेत. अर्थात त्याला अनेक कारणे आहेत आणि त्याचा फटका मानवाला बसतो आहे. असे का होत आहे हे कळत असूनही वळत नाही हीच मुख्य समस्या आहे. हवामानातील बदल हे मानवनिर्मित तसेच नैसर्गिकही आहेत. नुकताच महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा बसला. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसामुळे आंब्याचा मोहोर गळून पडला तर सांगली जिल्ह्यात द्राक्ष मण्यांना तडे गेले. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. अवकाळीच्या हलक्या सरींमुळे आंब्याचा मोहोर गळून पडला तर ढगाळ वातावरणामुळे कांदा, ज्वारीवर करप्याच्या प्रादुर्भावाची, हरभ-यावर घाटेअळी तर गव्हावर माव्याच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढली. ज्वारीच्या कणसामध्ये पाणी गेल्याने दाणे काळवंडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
तापमानवाढीमुळे हवामानबदल होत असल्याचे सांगितले जात आहे शिवाय त्याला नैसर्गिक कारणेही आहेत. असे असले तरी प्रामुख्याने मानवी हस्तक्षेप कारणीभूत आहे. 2023 हे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून अधिकृतरीत्या घोषित करण्यात आले आहे. मानवाने वातावरणात कार्बन डाय ऑक्साईडसारखा हरितगृह वायू विक्रमी प्रमाणात सोडल्याने पृथ्वी शंभर वर्षांपूर्वीच्या तुलनेत सर्वाधिक उष्ण बनली आहे.

मानवनिर्मित हवामानबदल आणि नैसर्गिक एल निनोच्या प्रभावामुळे 2023 हे वर्ष आजवरचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले. गत काही वर्षांत तापमानातील वाढ ही प्रामुख्याने एल निनोमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी संबंधित आहे. एल निनो ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.

या प्रक्रियेदरम्यान पूर्व प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील गरम पाण्यामुळे वातावरणात अधिक उष्णता पसरते. जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) आपल्या अहवालात म्हटले आहे की, बंगालच्या उपसागरातील मोरवा चक्रीवादळ 2023 मधील जागतिक स्तरावरील सर्वांत तीव्र चक्रीवादळांपैकी एक होते.
 
कार्बन डाय ऑक्साईड, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड या तीन वायूंचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान आणि समुद्राच्या पातळीत दुप्पट वाढ झाल्याचे तसेच अंटार्टिक समुद्रातील बर्फाचे आच्छादन घटल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले आहे. कॅनडा आणि अमेरिकेतील उष्णतेची लाट व वणव्याच्या घटना तसेच पूर्व आफ्रिकेतील दुष्काळ आणि नंतरची पूरस्थिती हे तापमानवाढीचे परिणाम आहेत असेही अहवालात म्हटले आहे.

पूर्वीपेक्षा अलिकडे तापमानवाढीचा वेग झपाट्याने वाढत चालल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. 2023 हे सर्वाधिक उष्ण वर्ष त्याचेच फलित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही तापमानवाढ कमी करण्याच्या दृष्टीने गांभीर्याने पावले उचलण्याची वेळ आली आहे. तसे न झाल्यास शेतीला आणि अन्य उत्पादनांना फटका बसू शकतो.

पाश्चात्त्य देशांत पाण्याच्या उपलब्धतेबाबत गंभीर समस्या उद्भवू शकतात. 2023 हे वर्ष अधिक उष्ण ठरल्याने 2024 या वर्षात थंडीची लाट येण्याची शक्यता कमी आहे. नव्या वर्षातही तापमान वाढलेलेच राहील असा इशारा जागतिक हवामान संघटनेने दिला आहे. हवामानातील टोकाच्या बदलामुळे दैनंदिन पातळीवर जीवनमान आणि रोजगार नष्ट होत चालले आहेत
 
 Edited by -Ratnadeep Ranshoor