शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (08:43 IST)

कोरोनाने दगावलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन महापौरांकडून दिवाळी फराळाचे वाटप

कोरोनामुळे कुटूंबातील सदस्याचा मृत्यू झाल्याने हिंदू रीतिरिवाजानुसार वर्षभर कोणताही सण साजरा केला जात नाही. मात्र दिवाळीचा सण ‘तम सोमा ज्योतिर्गमय’प्रमाणे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारा असतो.
 
हाच धागा लक्षात घेता आणि दुःखात असलेल्या कुटुंबियांना फराळ आणि संदेशपत्र घरपोच करुन आधार देण्याचा प्रयत्न महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. शहरात गेल्या वर्षभरात कोरोनाग्रस्त मृत्यूची संख्या जवळपास ५ हजारांच्या आसपास आहे, या सर्व कुटूंबियांना महापौर मोहोळ यांनी आधार दिला.
 
कोरोनामुळे गेल्या वर्षी मृत्यू झालेल्या जवळपास साडेचार हजार नागरिकांच्या कुटूंबियांना फराळ देऊन कुटूंबियांना आधार देण्याचा प्रयत्न केला होता. यंदाही जवळपास पाच हजार कुटूंबियांना हा आधार देण्याचा प्रयत्न महापौर मोहोळ यांच्याकडून केला गेला आहे.

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, गेल्या दीड-पावणे दोन वर्षात जवळपास साडेनऊ हजार कुटूंबियांच्या घरी दुःखाचे सावट होते. ज्यांनी कुटूंबियांतील सदस्य गमावले, त्यांचे दुःख कमी होणारे नसले तरी अशा कुटूंबियांना आधार देणे आवश्यक होते. म्हणूनच त्यांना आधार देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून संदेशपत्र आणि फराळ पोहोचवत आहोत.’

‘आपल्या हिंदू संस्कृतीत कुटूंबियांतील सदस्य गमावल्यास जवळपास वर्षभर सण साजरा केला जात नाही. मात्र कोरोनाच्या संकटकाळात एकूणच नकारात्मक वातावरणात निर्माण होते. या पार्श्वभूमीवर दुःखाचा डोंगर मागे सारून नवी पहाट अशा कुटूंबियांमध्ये आणणे आवश्यक होते. त्या दृष्टीने प्रयत्न म्हणून कुटूंबियांचा आधार देण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः काही कुटूंबियांकडे जाऊन आधार देण्याचा प्रयत्न केला असून संपूर्ण पाच हजार कुटूंबियांमध्ये फराळ पोहोच करण्यात येत आहे’, असेही महापौर म्हणाले.