शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (21:54 IST)

शाळा सुरू राहणार का बंद होणार आरोग्यमंत्री टोपें यांनी दिले स्पष्टीकरण

Health Minister Tope clarified whether the school will continue or close
मुंबईसह राज्यभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या शाळांचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुलांमध्ये संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने सरकार खबरदारीच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करणार की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राज्यातील शाळा पूर्ववतच सुरू राहतील, शाळा बंद
करण्याबाबत तूर्ततरी कुठलाही नवीन निर्णय घेण्यात येणार नाही, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कोरोना परिस्थितीवर भाष्य केलं.
शाळांबाबतही सरकार काय निर्णय घेणार असा प्रश्न यावेळी पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांना उपस्थित करण्यात आला होता. त्यावर बोलताना राजेश टोपे यांनी शाळांबाबत तूर्तास तरी सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही, असेही स्पष्ट केले आहे.
त्यामुळे ज्याप्रमाणे सध्या शाळा सुरु आहेत, तशाच त्या सुरु राहतील, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.राज्यात कोरोनाला उतरती कळ लागल्यानंतर ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढीस लागला आहे.
या नव्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने काही नियम कठोर केले आहेत. कोरोना महामारीमुळे अनेक दिवस बंद असलेल्या शाळा नुकत्याच काही भागात सुरु करण्यात आल्या. मात्र ओमायक्रॉनच्या संकटामुळे आता पुन्हा सुरु झालेल्या
शाळांवर पुन्हा एकदा कुलूपबंदचे संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राज्य सरकारने अशा शक्यतेचे खंडन केले आहे.