शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (21:26 IST)

महत्वाचे : मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा स्थगित

exam
मुंबई विद्यापीठाअंतर्गत ३ फेब्रुवारी पासूनच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या असून पुढील परीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असं मुंबई विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सांगितलं आहे.
 
अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने २ फेब्रुवारीपासून परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या हिवाळी सत्राच्या विविध विद्याशाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
 
शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर गेल्यामुळे परीक्षेच्या कामकाजामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा शुक्रवार ३ फेब्रुवारी २०२३ पासून स्थगित करण्यात आल्या आहेत. स्थगित केलेल्या सर्व परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल, असं मुंबई विद्यापीठच्या जनसंपर्क विभागाने सांगितलं आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor