शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 जून 2023 (14:02 IST)

लातूरच्या सरकारी रुग्णालयात सुरक्षा रक्षकाकडून रुग्णाला इंजेक्शन

शासकीय रुग्णालयात अनेकदा रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याच्या  बातम्या समोर येतात. रुग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्यामुळे रुग्ण दगावतात. लातूरच्या एका शासकीय रुग्णालयातून रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या रुग्णालयात रुग्णाचा उपचार डॉक्टर कडून नव्हे तर रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाकडून केल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.  
 
सदर घटना लातूरच्या शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयातील आहे. या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील रेणापूर गावातील शब्बीर शेख हे अपघात जखमी झाले असून त्यांना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले होते. डॉक्टरांनी त्यांना तपासून नर्सला सलाईन आणि इंजेक्शन लावायला सांगितले. मात्र नर्सने रुग्णाला स्वतः काही न उपचार देता चक्क रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाला सलाईन आणि इंजेक्शन देण्यास सांगितले. 
 
रुग्णाच्या नातेवाइकांनी या गोष्टीचा विरोध केला. मात्र सुरक्षारक्षक कोणालाही न जुमानता रुग्णाचा उपचार करत होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रुग्णालयाच्या प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उद्भवत आहे.
 
रुग्णाच्या नातेवाइकांनी या बाबत रुग्णालयाच्या डॉक्टरांकडे तक्रार केली असता डॉक्टरांनी येऊन उपचार केले आणि नर्स आणि सुरक्षारक्षकाला जाब विचारला. 
या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई केली जाणार असे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी सांगितले. 
 
Edited by - Priya Dixit