कोळसे पुढे म्हणाले की फर्ग्युसन महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने परवानगी नाकारण्याचे कारण काय आहे ? टिळकांनी हे महाविद्यालय उभा केले आहे त्यांना शाहू महाराजांनी मदत केली होती. याच टिळक आणि त्यांच्या शिष्यांनी कट करून छत्रपती शाहू महाराजांच्या मार्गात बॉम्ब टाकला होता. तरी त्यांना शाहू महाराजांनी मदत केली आहे. तर शिरोळेंनी महाविद्यालयासाठी जमीन दिली. त्या फर्ग्युसन महाविद्यालयात भाषण न करू देणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळचेपी आहे, असा आरोप कोळसे पाटील यांनी केला आहे.
कोळसे-पाटील फर्ग्युसन महाविद्यालयात आल्यानंतर त्यांच्याविरोधात अभाविपच्या विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कोळसे-पाटील मुर्दाबादच्या घोषणा दिल्या तर त्यांना प्रत्युत्तर म्हणून विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाने कोळसे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. विरोध करणाऱ्या गटाने फर्ग्युसनच्या कँपसमधील रस्त्यांवर ‘कोळसे पाटील गो बॅक’, ‘राज्यघटनेची पायमल्ली करणारे राज्यघटनेवर काय बोलणार’ अशाप्रकारचे अनेक संदेश लिहून विरोध दर्शवला. एकीकडे विरोध सुरू असतानाही कोळसे-पाटील यांनी इतर विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.