शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 मे 2022 (11:51 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवरील फेसबुक पोस्टप्रकरणी केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ketki chitale
अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त विधानांनी अनेकदा चर्चेत असते. यावेळी केतकीनं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती.त्यामुळे केतकी चितळे विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली.
 
केतकीला याप्रकरणी शनिवारी (14 मे) ताब्यात घेण्यात आलं होतं. रविवारी (15 मे) तिला ठाणे सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयानं तिला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 
केतकीविरोधात कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव इथं तसंच पवई आणि नाशिक सायबर पोलिसांतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 केतकी चितळेला पोलीस तिच्या कळंबोलीतील घरातून ताब्यात घेऊन नेत असताना तिच्यावर शाई फेकण्यात आली, तसंच अंडीही फेकण्यात आली. शिवाय, कार्यकर्त्यांनी केतकीला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.
 
दरम्यान, केतकी चितळेच्या पोस्टवर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटलं होतं, "केतकी चितळेला मी ओळखत नाही. तिनं जे केलंय, त्याबाबत कायद्याला काम करू द्या."
 
"एखाद्या व्यक्तीनं मरावं, असं कोण बोलतं? हे संस्कृतीत बसतं का? ही विकृती समाजासाठी वाईट आहे. आज आमच्यावर बोलली, उद्या तुमच्यावरही बोलेल," असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.