सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 एप्रिल 2022 (11:46 IST)

कोल्हापूर पोटनिवडणूक निकाल: काँग्रेसच्या जयश्री जाधव यांची विजयी घौडदोड

jayashree jadhav
कोल्हापूर उत्तरमध्ये कुणाच्या नावानं गुलाल उधळला जाणार हे आज (शनिवार) दुपारपर्यंत स्पष्ट होईल. आज सकाळी 8 वाजल्यापासून राजाराम तलावाशेजारील जलसंपदा विभागाच्या गोदामात ही मतमोजणी सुरू झाली आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
 
मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या आहेत. पंधराव्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव 14 हजार 938 मतांनी आघाडीवर आहेत.
 
कोल्हापूर उत्तर जागेसाठी 12 एप्रिल रोजी यासाठी मतदान झाले होते. एकूण 61.19 टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी वाढल्याने निकालाची उत्सुकता आहे. पण वाढलेल्या मतदानाचा कुणाला फायदा होणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.
 
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली, तर भाजपने महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सत्यजित उर्फ नाना कदम यांना उमेदवारी दिली होती.
 
कोल्हापूरात सतेज उर्फ बंटी पाटील विरुद्ध महाडिक असा पारंपरिक संघर्ष असतो.
 
आजवर हा सामना कोल्हापूर दक्षिणमध्ये बघायला मिळायचा. पण मागील काही निवडणुकांमध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात हा सामना पाहायला मिळाला, मग यात गोकुळ दूध संघाची निवडणूक असेल वा आजची कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक.
 
सत्यजित कदम यांचे आमदार सतेज पाटील यांच्याशी राजकीय वैर आहे. कदम हे महाडिक गटाचे कट्टर समजले जातात.