सोमवार, 20 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 मे 2020 (16:25 IST)

आदिवासी बांधवांना दिलासा, वनहक्क कायदा दुरुस्ती संदर्भात राज्यपालांची अधिसूचना जारी

Maharashtra Guv Bhagat Singh Koshyari modifies Scheduled Tribes and Forest Dwellers Act
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनुसुचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६  या कायद्यामध्ये  महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रासंदर्भात काही सुधारणा केल्या आहेत.
 
भारतीय संव‍िधानाच्या पाचव्या अनुसुचीमधील प्राप्त अधिकारांचा वापर करुन राज्यपालांनी दिनांक १८ मे २०२० रोजी एका अधिसूचनेव्दारे उपरोक्त कायदयाच्या कलम ६ मध्ये या सुधारणा केल्या आहेत.
 
वन हक्क कायद्याअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय समितीकडून वैयक्तिक किंवा सामुदायिक वनहक्काचे दावे नामंजूर झाले आहेत अशा आदिवासी बांधवांना या अधिसूचनेमुळे समितीच्या आदेशाविरोधात दाद मागता येणार आहे. सदर अधिसूचना राज्यातील पेसा क्षेत्राकरीता लागू असेल. 
 
नव्या अधिसुचनेनुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या असून सदर समित्यांकडे  जिल्हा समितीच्या निर्णयांच्या   विरोधात अपील करता येणार आहे. 
 
जिल्हा स्तरीय समिती कडून वैयक्तिक व सामुदायिक वनहक्कांचे दावे मोठ्या प्रमाणात नामंजूर करण्यात येत असल्याचे राज्यपालांचे निदर्शनास आले होते. मात्र जिल्हा समितीच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची सदर कायद्यात कुठलीही तरतूद नव्हती. अधिसूचनेमुळे बाधित आदिवासींना दिलासा मिळणार आहे.
 
राज्यपालांच्या अधिसूचनेची प्रत सोबत जोडली आहे तसेच  सर्वसाधारण माहितीसाठी सदर अधिसूचना राजभवनाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आली आहे.