सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 जुलै 2019 (08:55 IST)

समुद्वारात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे महाराष्ट्रात वळविणारा राज्यातील पहिला देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प पूर्ण

महाराष्ट्रातील पश्चिमकडे गुजरातला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणाऱ्या आणि छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून सदर बोगद्यातून पाणी वाहून पुणेगाव धरणात येण्यास सुरवात झाली आहे. या पाण्याचे जलपूजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आणि आमदार नरहरी झिरवाळ, आ. पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत गुरुवार दि. २५ जुलै २०१९ रोजी सकाळी ११वा. देवसाने येथे होणार आहे. वर्षानुवर्ष दुष्काळामध्ये असलेल्या येवला व चांदवडसह दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी या प्रकल्पामुळे जलसंजीवनी मिळणार आहे. 
 
पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते वळण योजनांद्वारे पुर्व वाहिनी गोदावरी खोऱ्यामध्ये वळविण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळांच्या प्रयत्नामुळे जलसंपदा विभागाने दि.२४ नोव्हेंबर २००६ ला मांजरपाडा या महत्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली. पश्चिम वाहिनी-पुर्व वाहिनी खोरे दुभाजक रेषेच्या पश्चिम बाजूला वाहत जाणारे छोटे छोटे नाले तीव्र उतार सुरु होण्याआधी छोटे बंधारे बांधून अडविणे. त्यांचा सांडवा पुर्व बाजूला काढून सांडव्यावरून वाहून जाणारे पाणी कालव्याद्वारे पुर्व बाजूला गोदावरी खोऱ्यात वळविणे असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. 
 
गुजरातसह समुद्रामध्ये वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात पूर्वेकडे वळविणारी ही राज्यातील पहिली योजना आहे. मांजरपाडा वळण योजनेंतर्गत देवसाने गावाच्या खालील बाजूस पाणी अडवून सदरचे पाणी बोगद्याद्वारे प्रवाही पध्दतीने गोदावरी खोऱ्यातील पुणेगांव धरणाच्या वरील बाजूस ऊनंदा नदीत सोडण्यात आले आहे.  सदर योजनेद्वारे ६०६ दलघफू पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त स्थानिक वापरासाठी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. 
 
या प्रकल्पामधील मांजरपाडा धरणाची एकूण लांबी ३४५० मीटर इतकी असून समुद्र सपाटीपासून धरणमाथा पातळी ७२२ मीटर व पूर्णसंचय पातळी ७१८ मीटर आहे. धरणाच्या एकूण लांबीत एकूण १२ नाले अडविण्यात आले आहे. सदरचे पाणी १.२० कि.मी. लांबीचा जोड बोगदा व ८.९६० कि.मी. लांबीचा वळण बोगदा असे एकूण १०.१६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याद्वारे पुढे उनंदा नदीतील ३.२० कि.मी.लांबीच्या उघड्या चऱ्याद्वारे मौजे हस्ते या गावांजवळ ऊनंदा नदीत सोडण्यात येणार आहे. ते पुढे गोदावरी खोऱ्यातील पुणेगाव धरणाद्वारे चांदवड व येवला तालुक्यात वितरीत करण्यात येणार आहे. आगामी काळात पार गोदावरी या नदीजोड प्रकल्पाद्वारे वळविले जाणारे पाणी सुद्धा याच बोगद्याद्वारे गोदावरी खोऱ्यात आणले जाणार आहे.
 
मांजरपाडा वळण योजनेमुळे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, निफाड व येवला या तालुक्यांना पाणी उपलब्ध होणार असून येथील क्षेत्र मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली येणार आहे. त्याचबरोबर सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील स्थानिक शेतकऱ्यांच्या वापरासाठी पाणी राखीव ठेवण्यात आल्याने सदर प्रकल्पाच्या जवळच्या शेतकऱ्यांना फायदा होऊन सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील सिंचनात सुद्धा मोठी वाढ होणार आहे.
 
मांजरपाडा वळण योजनेसाठी एकूण ६४.२४ हे. वनजमीन तर ३०.१८ हे. खाजगी जमीन संपादीत करण्यात आलेली आहे. भुजबळांच्या प्रयत्नामुळे कमी कालावधीमध्ये वनविभागाच्या परवानग्या मार्गी लागल्या. खाजगी जमीन संपादित करतांना सरळ खरेदी पद्धतीने चांगल्या दराने जमीन संपादित केल्याने स्थानिक शेतकऱ्यांचा लाभ झाला आहे. या योजनेची किंमत ३२८.४५ कोटी इतकी आहे. सन २०१४ पर्यंत आघाडी सरकारच्या काळामध्ये या बोगद्याचे काम जवळजवळ ९० टक्के काम पूर्ण झालेले होते. वेळोवेळी मंजूर असलेल्या निधी खर्चाला आघाडी सरकारच्या काळात मान्यता दिल्यामुळे या प्रकल्पाचे काम जोरात सुरु होते. मात्र २०१४ मध्ये राजकिय हेतूने उर्ध्व गोदावरी प्रकल्पाची चौकशी लाऊन या प्रकल्पाचे काम रखडविण्यात आले. या कामाच्या चौकशीसाठी मेरीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्य तांत्रिक समिती नेमली गेली. राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडून या योजनेचे तांत्रिक लेखापरीक्षण करण्यात आले. चौकशीच्या अग्निदिव्यातून गेल्यानंतर ही योजना व्यवहार्य असल्याचे सिद्ध झाले. राज्य तांत्रिक सल्लागार समितीने शासनाला तसा अहवाल दिला त्यामुळे या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. आघाडीचे सरकार असतांना भुजबळांच्या प्रयत्नामुळे मांजरपाडाच्या उर्वरित कामांसाठी ७० कोटींची तरतूद करून ठेवली होती. मात्र सत्तापरिवर्तनानंतर ही रक्कम इतरत्र वळविण्यात आली. दरम्यानच्या काळात छगन भुजबळ कारागृहात असल्याने तेथूनही या कामासाठी त्यांचा सतत रेटा सुरु होता. त्यामुळे शासनाला या प्रकल्पाला तृतीय प्रशासकीय मान्यता द्यावी लागली. भुजबळांनी सतत या प्रकल्पाला भेटी देऊन कामांचा आढावा घेतला. तसेच रखडलेले कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी मार्ग काढला. त्यामुळे जूनमध्ये या प्रकल्पाच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले. केवळ भुजबळांचा प्रकल्प म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या नावाखाली मांजरपाड्याचे काम अन्यायकारकरित्या बंद पाडल्याने मांजरपाडा प्रकल्पाच्या कामाला विलंब झाला. अन्यथा ३ वर्षापूर्वीच हे पाणी दुष्काळग्रस्त असलेल्या येवला व चांदवड तालुक्यात आले असते. 
 
मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पुणेगाव धरणातून पुणेगाव डाव्या कालव्याद्वारे ६३ किमीवरील दरसवाडी प्रकल्पात जाणार आहे. दरसवाडी कालव्यातून ८८ किमी डोंगरगांव पोहोच कालव्यात म्हणजे एकूण १५४ किमीच्या प्रवासाने हे पाणी डोंगरगाव लपा तलावात टाकण्याचे नियोजन आहे. या योजनेद्वारे कालव्यातून थेट बंधाऱ्यांमध्ये पाणी टाकले जाणार आहे. यात चांदवड तालुक्यातील ५ व येवल्यातील ३५ पाझर तलावांसह २ लघु पाटबंधारे प्रकल्प भरण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे दिंडोरीतील सिंचनाला तर फायदा झालाच आहे. मात्र त्याचप्रमाणे चांदवडमधील ६३ किमी आणि येवल्यातील ८८ किमी अंतरामधील अनेक गावांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. उर्ध्व गोदावरी प्रकल्पांतर्गत पाण्याची तुट भरून काढण्यासाठी मांजरपाडा योजना ही अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे.
 
स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार सदर नदीवर तीन पुल, दोन बंधारे व स्थानिक लोकांसाठी गावतळयांची देखील तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच स्थानिकांच्या मागणीनुसार मांजरपाडा वळण योजनेचे नांव बदलुन देवसाने वळण योजना ता.दिंडोरी जि.नाशिक असे करण्यास दि.३१ मे २०१९ च्या शासननिर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे. पश्चिमेकडे समुद्रात आणि गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी अडवून ते वळण योजनेद्वारे बोगद्यातून पूर्वेकडे पुणेगाव मध्ये आणणे ही कल्पना सुद्धा १३ वर्षांपूर्वी स्वप्नवत होती. मात्र ही स्वप्नवत योजना आज प्रत्यक्षात साकारलेली आहे.
 
याव्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातील दमणगंगा तसेच नार-पार खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेले पाणी नदीजोड प्रकल्पांद्वारे पूर्वेकडे अतितुटीच्या गिरणा व गोदावरी या खोऱ्यामध्ये वळवले जावे यासाठी भुजबळांचा संघर्ष सुरु आहे. दमणगंगा व नार-पार खोऱ्याच्या पाणलोट क्षेत्रातील महाराष्ट्राच्या हद्दीतील संपूर्ण पाण्यावर महाराष्ट्राचा हक्क अबाधित रहावा व ते पाणी गुजरातमध्ये जाऊ न देता महाराष्ट्रात वळवावे यासाठी भुजबळांचे प्रयत्न सुरु आहेत.