गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (21:33 IST)

सीईटी परीक्षांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२चे निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र सीईटी परीक्षांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२चे निकाल जाहीर करण्यात आले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे. बुधवारी संध्याकाळी ७ वाजता MHT CETच्या अधिकृत वेबसाइटवर हा निकाल जाहीर करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सीईटी परीक्षा अनेक वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षांचे निकाल कसे लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष होते. सीईटी परीक्षांच्या निकालासोबत B.Tech आणि B.Arch अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम आणि श्रेणीनिहाय गुणवत्ता यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 
मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, फिजिकल एज्युकेशन, हॉटेल मॅनेजमेंट यासारख्या अनेक अभ्यासक्रमांसाठीच्या सीईटी परीक्षा यावेळी घेण्यात आल्या होत्या. सीईटी परीक्षांच्या निकालांवर पुढील अभ्यासाठी प्रवेश घेण्यात येतो त्यामुळे विद्यार्थी या सीईटी परीक्षांच्या निकालाची वाट पाहत होते.