रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , बुधवार, 15 डिसेंबर 2021 (15:19 IST)

मनसेच्या उपाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आपल्या सर्व पदांसह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान नव्या पक्षातील प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसात त्या घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे बुधवारपासून पुणे दौऱ्यावर आहेत. परंतु त्याआधीच रुपाली पाटील यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’केल्याने राजकारणात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
रूपाली पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. तसेच मनसेच्या महिला विभागाच्या पुणे शहराध्यक्ष म्हणून त्या कार्यरत होत्या. मंगळवारी त्यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून त्यांना ऑफर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.
रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे. मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे, असं रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे पत्रात लिहिलं आहे. तसेच आपले आशीर्वाद आणि “श्री.राज ठाकरे”हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहील, अशी भावना व्यक्त करत ठोंबरे यांनी राजीनामा दिला आहे.
राजीनामा देण्याआधी रुपाली या युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची सह्याद्री अतिथिगृहात भेट घेऊन चर्चा केल्याने त्या शिवसेनेत जाणार, अशी चर्चा रंगली आहे. सरदेसाई यांच्या आधी रुपाली पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटल्या आणि राष्ट्रवादीतील प्रवेशाचा मुहूर्तही ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रुपाली या आपल्या मनगटावर घड्याळ की शिवबंधन याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मूळ वकील असलेल्या रुपाली या मनसेच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या १४ वर्षापासून राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. या काळात महापालिकेच्या २०१२ निवडणुकीत त्या मनसेच्या तिकिटावर नगरसेवक झाल्या. त्यानंतरच्या २०१७ च्या निवडणुकांत त्यांचा पराभव झाला, तरीही त्या राजकारणात सक्रिया राहिल्या आणि विधानसभेच्या २०१९ निवडणुकीत त्या कसबा मतदारसंघातून मनसेकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होत्या.
रुपाली पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
दरम्यान, मनसेच्या सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील या आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याशी त्यांची चर्चा झाली आहे. जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या शुक्रवारी रुपाली पाटील या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याबाबत अद्याप खात्रीलायक माहिती मिळालेली नाही.