शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मार्च 2017 (13:06 IST)

एमपीएससी परीक्षा निकाल : नाशिकचे भूषण अशोक अहिरे राज्यात प्रथम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०१६ चा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील भूषण अशोक अहिरे याने राज्यात प्रथम कमांक पटकावला. सातारा जिल्ह्यातील पूनम संभाजी पाटील हिने महिलांमधून प्रथम क्रमांक मिळवला आहे. यात यशस्वी १३० उमेदवारांची यादी आयोगाने जाहीर केली आहे. त्यामध्ये ३४ महिला आणि दोन दिव्यांग उमेदवारांची शिफारसही आयोगाने सरकारकडे केली आहे.

भूषण अहिरे अभियांत्रिकी विद्याशाखेचा पदवीधर असून त्याची उपजिल्हाधिकारी पदाकरिता निवड झाली आहे. तर पूनम पाटील हिची पोलीस उपअधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त या पदाकरिता निवड झाली आहे. उपजिल्हाधिकारी पदासाठी भूषण अहिरेसह श्रीकांत गायकवाड, संजयकुमार ढवळे, संदीप भास्के आणि नीलम बाफना यांची निवड झाली आहे. तर पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त या पदाकरिता पूनमसह अमोल ठाकूर, सागर पवार, अमोल मांडवे हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले आहेत.

एमपीएससीतर्फे १० एप्रिल २०१६ रोजी मुंबईसह राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवर राज्य सेवा (पूर्व)परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेस १ लाख ९१ हजार ५६३ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला होता. पूर्व परीक्षेतील निकालाच्या आधारे १ हजार ५७५ उमेदवार मुख्य परीक्षा देण्याकरिता यशस्वी ठरले होते. ४१८ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते.